मंत्रालयातील पत्राचा प्रवास बघा माेबाइलवर; प्रवेशद्वारावर होणार स्कॅनिंग, महाराष्ट्रदिनी होणार शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:37 AM2023-04-09T05:37:12+5:302023-04-09T05:37:44+5:30

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देण्याच्या निमित्ताने दररोज हजारो लोक मंत्रालयात फेरफटका मारतात.

Watch the journey of the ministry letter on mobile Scanning will be done at the entrance launch will be on Maharashtra Day | मंत्रालयातील पत्राचा प्रवास बघा माेबाइलवर; प्रवेशद्वारावर होणार स्कॅनिंग, महाराष्ट्रदिनी होणार शुभारंभ

मंत्रालयातील पत्राचा प्रवास बघा माेबाइलवर; प्रवेशद्वारावर होणार स्कॅनिंग, महाराष्ट्रदिनी होणार शुभारंभ

googlenewsNext

मनोज मोघे

मुंबई :

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र देण्याच्या निमित्ताने दररोज हजारो लोक मंत्रालयात फेरफटका मारतात. यामुळे मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि दैनंदिन कामात येणारा अडथळा रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३७ विभागांची दररोजची सुमारे ४० हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. या ठिकाणच्या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार असून त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर मिळणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या यंत्रणेचा शुभारंभ होईल.

हजारो तक्रारी, अर्ज, निवेदने यांचा खच मंत्रालयात पडत असतो. या पत्रांचे विलगीकरण करून संबंधित विभागाला पाठविण्याचे आणि त्या पत्रांना उत्तर देण्याचे मोठे जिकिरीचे काम येथील टपाल विभागाकडून पार पाडले जाते.  ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यासाठी तसेच मंत्रालयाचा कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय टपाल यंत्रणा (सेंट्रल रजिस्ट्री युनिट) प्रवेशद्वारावर उभारली जात आहे. या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. 

मोबाइलवर मिळणार टोकन नंबर 
- सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये आल्यानंतर ज्या विभागातील खिडकीवर पत्र येईल ते अत्याधुनिक स्कॅनरवर तत्काळ स्कॅन हाेईल. 
- त्यानंतर या पत्राचा टोकन नंबर तयार होईल, तो पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येईल. त्यानंतर या पत्राची स्कॅन कॉपी संबंधित विभागाकडे जाईल. त्यानंतर पत्रावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे, हे पत्र देणाऱ्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाइटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे.

Web Title: Watch the journey of the ministry letter on mobile Scanning will be done at the entrance launch will be on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.