नभांगणात उद्या पाहा विलोभनीय ‘सुपर पिंक मून’; खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:44 AM2021-04-26T00:44:56+5:302021-04-26T06:37:34+5:30
खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी
मुंबई : अवकाशात मंगळवार, २७ एप्रिल रोजी विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. यंदाची चैत्र पौर्णिमा ही सुपर मून पौर्णिमा असून वर्षातील पहिला सुपर मून असेल. या वेळी चंद्र १० टक्के मोठा व ३० टक्के तेजस्वी दिसेल. सुपर मूनचे वैशिष्ट्य म्हणजे पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ ते २८ असे ३ दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल.
चंद्र व पृथ्वीमधील अंतर ३,५८,६१५ किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. प्रत्येक वर्षी सुपर मूनच्या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर कमी, अधिक होत असते. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हे कमीतकमी अंतर ३,५६,५०० किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते. यंदा हे सर्वात कमी अंतर २६ मे २०२१ रोजी असेल. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ होता. नोव्हेंबर २०१६ ला ताे पृथ्वीच्या खूप जवळ आला. २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपर मून हेही खूप कमी अंतराचे असतील.
रंगाशी संबंध नाही!
चंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला मोठी भरती येते. पाश्चात्य लोकांनी या पौर्णिमेला पिंक मून म्हणून संबोधले असले तरी त्याचा रंगाशी काहीही संबंध नाही.
सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना मोठ्या आकाराचा दिसेल. सुपर मून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येईल.