Join us

टीव्हीवरचे कार्यक्रम आता मोबाइलवर पाहा मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:10 AM

सुहास शेलारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डिश टीव्ही, फायबर आणि ओटीटीचे प्रस्थ वाढू लागल्यामुळे, केबल व्यावसायिक अडचणीत सापडले ...

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : डिश टीव्ही, फायबर आणि ओटीटीचे प्रस्थ वाढू लागल्यामुळे, केबल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या काळात जवळपास ४० टक्क्यांहून अधिक ग्राहक दुरावल्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केबलवाल्यांनी नवी यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठीच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केबल ग्राहकांना टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना पाहता येणार आहेत.

फायबर आणि ओटीटीच्या ग्राहकांना पुन्हा आपल्या कक्षेत आणण्यासाठी केबल व्यावसायिकांनी स्वतःची प्रक्षेपण यंत्रणा विकसित केली आहे. ‘एओएसपी’ आणि ‘एटीव्ही’ मान्यता प्राप्त असलेली ही यंत्रणा एकाच पॅकेजमध्ये टीव्ही, इंटरनेट, ओटीटी आणि क्रोम कनेक्ट सुविधा देईल. क्रोम कनेक्टद्वारे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर आणि घरात दुसरा स्मार्ट टीव्ही असल्यास, त्यावरही पाहता येतील, शिवाय मल्टिप्लेक्ससोबत करार केल्याने, शुक्रवारी प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत. त्यासाठी मात्र शुल्क आकारले जाईल.

खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकायचे असल्यास, केबलवाल्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरल्यावाचून पर्याय नाही. त्यामुळेच ‘फायबर स्ट्राँग कम्युनिकेशन’च्या सहकार्याने आम्ही ही सेकंड जनरेशन यंत्रणा तयार केली. ११ एचडीएमआय तंत्राच्या माध्यमातून एकाच पॅकेजमध्ये बऱ्याच सुविधा ग्राहकांना देण्यात येतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या ‘४ के’ बॉक्समुळे विनाअडथळा टीव्ही, इंटरनेट आणि अन्य सेवांचा वापर करता येईल, अशी माहिती शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी दिली.

आघाडीच्या कंपन्या ग्राहकांकडून बरेच छुपे शुल्क वसूल करतात. इंटरनेटच्या स्पीडबाबत सर्वाधिक तक्रार असते, अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोणतेही हिडन चार्जेस नाहीत, पॅकेजमध्ये नमूद केल्यानुसार सर्व डेटा ग्राहकांना वापरता येईल. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. मुंबईसह राज्यातील केबल चालकांना या तंत्रज्ञानाशी जोडून देशभरात या यंत्रणेचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

............

वर्षिक शुल्क – १०,५०० रुपये.

एका बॉक्समध्ये या सुविधा मिळणार...

- टीव्ही चॅनल्स

- इंटरनेट

- ओटीटी

- क्रोम कनेक्टद्वारे मोबाइल आणि दुसऱ्या टीव्हीलाही जोडणी

- फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता येणार

- जगातील आघाडीचे शैक्षणिक चॅनल दिसणार