Join us

‘आपलीमुंबईचीमुलगी’ विरुद्ध ‘चौकीदार’; सोशल नेटवर्किंगमध्ये वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:02 AM

मीडिया टीम अ‍ॅक्टिव्ह आणि अग्रेसर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसाराने जशी मुलुखमैदाने गाजत आहेत; त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही धुमाकूळ सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडून सोशल मीडियावरील प्रचारात रंगत आणली जात असून, मुंबईचा विचार करता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर या ‘आपलीमुंबईचीमुलगी’ तर गोपाळ शेट्टी हे ‘चौकीदार’ या नावाखाली सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून बॉलीवूडचा चेहरा असलेल्या ऊर्मिला यांना उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. महत्त्वाचे म्हणजे बोरीवली येथील गोंधळानंतर सर्वांच्याच नजरा या मतदारसंघाकडे वळल्या आहेत. ऊर्मिला आणि शेट्टी यांची सोशल मीडिया टीम अ‍ॅक्टिव्ह आणि अग्रेसर असून, ऊर्मिला सध्या ‘आपलीमुंबईचीमुलगी’ या हॅशटॅगद्वारे सातत्याने चर्चेत आहेत.दहिसर येथील रॅली, महिला आरक्षण कायद्याचा विषय, कांदिवली येथील सभा, मालाड येथील रॅली, ‘लेटस टॉक’ संवादात्मक कार्यक्रम, ‘हॅप्पी इस्टर’मधून चिमुकल्यांसोबत काढलेली छायाचित्रे, ‘वुई स्टँड टुगेदर फॉर बेटर इंडिया’ हा कार्यक्रम, ‘अब होगा न्याय...’ हे पोस्टर, ‘लेट्स फाईट फॉर अवर राईट्स’ यासह प्रत्येक दिवसाचे रॅलीचे आणि सभेचे वेळापत्रक अशा प्रत्येक अपलोडिंग पोस्टला ‘आपलीमुंबईचीमुलगी’ या हॅशटॅगद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. भाजपने कार्यकर्त्यापासून खासदार झालेल्या गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली असून, शेट्टी हे केलेल्या कामांमुळे मतदारांमध्ये सुपरिचित आहेत. मात्र असे असले तरी ऊर्मिला यांना शेट्टी यांची सोशल मीडियाची टीम टक्कर देत असून, ‘चौकीदार’ या नावाखाली शेट्टी यांचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियावर तुफान वेगाने सुरू आहे.मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून प्रत्येक रॅलीसह सभेचे अपडेट ‘चौकीदार’ नावाखाली व्हायरल केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक समुदायासोबत झालेल्या प्रत्येक सभेचे अपडेट व्हायरल केले जात असून, रहिवाशांसोबत झालेल्या बैठकीची माहितीही सोशल मीडियावर अपलोड केली जात आहे. याबाबतची माहिती अपलोड करताना ‘फिरएकबारमोदीसरकार’ हा हॅशटॅग वापरला जात आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019मुंबई उत्तरगोपाळ शेट्टीउर्मिला मातोंडकरकाँग्रेसभाजपासोशल मीडिया