देशाच्या प्रधानसेवकांनी त्यांच्या टिष्ट्वटर नावापुढे चौकीदार लिहिले आणि मग चौकीदार असं लिहिण्याची सगळ्यांनाच घाई झाली. त्यात प्रधानसेवकांना कोणी टॅग केले, तर तेही त्याला उत्तर देत असल्याने, म्हणजेच त्यांच्या वतीने कोणीतरी उत्तर देत असल्याने काहींना भलताच उत्साह आला.या सगळ्याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर त्यावर काही जणांकडून टिपण्णी केली जातेय. जो तो उठतोय तो मी चौकीदार, तू चौकीदार, आपण सगळे चौकीदार... असाच सूर आळवू लागलेले पाहायला मिळत आहेत.स्वाभाविकच या चौकीदार पुराणापासून आपली भारतमाता सदन ही सहकारी सोसायटी कशी काय अलिप्त राहणार... मागे स्वच्छ भारत अभियानाचा जोर असताना सोसायटीच्या सदस्यांनी नव्याने स्वच्छता समिती नेमली होती. त्यात प्रत्येक घरातील एकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते. ६० फ्लॅटच्या या सहकारी सोसायटीतून फक्त सहा जण आले आणि प्रत्यक्ष सफाईला समिती अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार असे तीन जण उपस्थित होते. मैदानावर खेळत असलेल्या मुलामुलींना आयत्या वेळी विनवण्या केल्या आणि त्यांच्या मदतीने सफाई अभियान करण्यात आले. त्याचे फोटो प्रधानसेवकांना पाठविण्यात आले होते. त्यावर काहीच उत्तर न आल्याने खरे तर मंडळी नाउमेद झाली होती....पण म्हणूनच आता नव्या दमाने प्रयत्न करण्याचे ठरले. तत्काळ बैठक बोलविण्यात आली. विषय हाच...‘चौकीदार अभियानातला सहभाग आणि कार्यक्रम’.चर्चा खूप झाली, मतमतांतरांनी ती चर्चा नेहमीसारखीच रंगली. मग दीड तासाने एक कार्यक्रम ठरला. रविवारी सकाळी तो करायचा, यावर शिक्कामोर्तब करून समितीचे सदस्य आपापल्या घरी गेले. जाताना सेक्रेटरींनी थोडा रस्ता वाकडा केला आणि सोसायटीच्या गेटवर असलेल्या चौकीदाराला काहीतरी सांगून मग ते घरी गेले.रविवार उजाडला. सकाळी १० वाजता सोसायटीच्या हॉलमध्ये जमायची नोटीस आधीच घरोघरी फिरली होती. त्यानुसार, बरेच लोक जमले. अध्यक्ष आल्याबरोबर सेक्रेटरींनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. सोसायटीच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाइव्ह करण्यात येत होता. टिष्ट्वटवरही प्रधानसेवक, राज्यातले मुख्यसेवक यांना टॅग केले होते....आणि मग सेक्रेटरींनी चौकीदाराचे नाव पुकारले... दादोबा यांनी व्यासपीठावर यावे.गेली अनेक वर्षे दादोबा भारतमाता सदनाच्या सुरक्षेची काळजी घेत होते. ही सोसायटी बांधली, तेव्हा ते गावाहून आले आणि मग इकडचेच झाले. त्यांचे लग्न, संसार इथेच उभा राहिला. मुले मोठी झाली. दादोबा म्हणजे त्यांच्या सोसायटीवाल्यांच्या घरातलेच एक.त्यांचे नाव पुकारले गेले आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. अध्यक्षांनी दादोबांचा छोटेखानी सत्कार केला. भेटवस्तू देण्यात आली. चौकीदार अभियानाच्या निमित्ताने आपल्या चौकीदाराचा असा सन्मान करायचा होता. तो आपण केला. आता त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो, असे सेक्रेटरी म्हणाले.दादोबांना काय बोलावे हेच कळत नव्हते. काही क्षण शांततेत गेले.मग दादोबा हळूहळू बोलू लागले.इतकी वर्षे तुमची सेवा केली. तुमच्यापैकी अनेकांना लहानाचे मोठे होताना पाहिले... संसार उभे राहिलेले पाहिले.तुम्हीही माझी नेहमी काळजी घेतली... या सत्काराचे मोल मोठे आहे.आता तुम्ही सगळे काही तरी त्या चौकीदार अभियानाविषयी बोलत होतात... काल मुलगा पण सांगत होता, प्रधानसेवकही म्हणाले, ‘मैं चौकीदार...’आमच्या व्यवसायाला असे चांगले दिवस आलेले पाहून बरे वाटले, पण असे नुसते लिहून चौकीदार होता येत नाही. त्यासाठी तसे काम करावे लागते. दिवस-रात्र राबून काळजी घ्यावी लागते. थंडी-वाऱ्याची पर्वा न करता काम करावे लागते.नुसते नावापुढे ‘चौकीदार’ लिहून काही होत नाही.असे नाव लिहून काही होणार असेल, तर मग मीही माझ्या नावापुढे श्रीमंतांचे नाव लावतो आणि श्रीमंत होतो.तेव्हा नावापुढे काय लिहिले, यावर जाऊ नका... बाकी सत्काराबद्दल मनापासून आभारी आहे, एवढेच सांगायचे आहे.दादोबा एवढे बोलून थांबले... काही काळ शांततेत गेला आणि मग सगळ्यांनीच मनापासून टाळ्या वाजवत... दादोबांच्या हजरजबाबीपणाला दाद दिली. - म. हा. मुंबापुरीकर
चौकीदार हाजीर हो!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:32 AM