ओबीसी आरक्षणात वाटेकरी मान्य नाही - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:24 AM2020-12-14T04:24:43+5:302020-12-14T04:24:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे, याबाबत दुमत नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे, याबाबत दुमत नाही. मात्र, ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल, तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला.
भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी कलम टाकले. ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या आरक्षणात कुणालाही वाटेकरी केले जाणार नाही, हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
जोपर्यंत ओबीसी समाजात ३४६ घटक आहेत, जोपर्यंत या घटकांचा विकास होत नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. आगामी काळात या सर्व घटकांचे मेळावे घेतले जातील. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असं ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचे योगदान मोठे आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटले जायचे, असेही फडणवीस म्हणाले.
---------------------