दररोज १६ लाख उत्पन्नावर पाणी

By admin | Published: March 20, 2015 12:27 AM2015-03-20T00:27:14+5:302015-03-20T00:27:14+5:30

गेल्या चार महिन्यांपासून ही लोकल धावलीच नसल्याने रेल्वे प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागल्याचे समोर आले आहे.

Water on 16 lakhs of income every day | दररोज १६ लाख उत्पन्नावर पाणी

दररोज १६ लाख उत्पन्नावर पाणी

Next

मुंबई : कोकणच्या प्रवाशांसाठी नव्याने आणण्यात आलेल्या एसी डबल डेकरला सायडिंगलाच उभे करून ठेवण्यात आले आहे. गेल्या चार महिन्यांपासून ही लोकल धावलीच नसल्याने रेल्वे प्रशासनाला मोठे नुकसान सोसावे लागल्याचे समोर आले आहे. या ट्रेनमधून मिळणाऱ्या दररोज १६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने एसी डबल डेकर ट्रेन मागील वर्षी सुरू केली. हा गर्दीचा काळ असल्याने मध्य रेल्वेकडून प्रीमियम ट्रेन सुरू करण्यात आली. मात्र मागणीनुसार वाढत जाणारे भाडे यामुळे तिकिटांची किंमत अवाच्यासवा होत गेल्याने या ट्रेनचा प्रवास प्रवाशांनी नाकारला. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रीमियम म्हणून चालविण्यात आली. मात्र कोकणात जाण्यासाठी हा गर्दीचा काळ नसल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर चार महिने उलटूनही एसी डबल डेकर पुन्हा कोकणवासीयांच्या सेवेसाठी धावू शकली नाही. या ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न समोर आणत मध्य रेल्वेने तिला पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कारशेडमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु देखभाल-दुरुस्तीसाठी न जाता ही ट्रेन विरार येथे सायडिंगलाच ठेवण्यात आली. गेल्या चार महिन्यांत ट्रेन धावू न शकल्याने यातून दररोज मिळणाऱ्या तब्बल १६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर रेल्वे प्रशासनाला पाणी सोडावे लागल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही ट्रेन देखभाल-दुरुस्तीसाठी जरी पश्चिम रेल्वेमार्गावर उभी असली तरी इंजिनासह ११ डबा असलेल्या ट्रेनचे २ डबे दक्षिण रेल्वेकडे पाठविण्याचाही विचार मध्य रेल्वेकडून सुरू आहे.

हॉलिडे स्पेशल म्हणून धावत असलेली एसी डबल डेकर ट्रेन नियमित धावावी यासाठी कोकण रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहे. तशी परवानगीच रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप तरी मध्य रेल्वेने ही ट्रेन नियमित धावण्यासाठी कुठलाही प्रस्ताव सुरक्षा आयुक्तांकडे पाठविलेला नाही.

Web Title: Water on 16 lakhs of income every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.