लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यात रेल्वे मार्गावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान उच्च क्षमतेचे तब्बल १६६ पंप बसविले आहेत. त्यामुळे ट्रॅकमधील पाणी पंपाच्या मदतीने तत्काळ उपसता येणार आहे. मुंबई उपनगरात दरवर्षी विक्रमी पाऊस कोसळतो, तसेच पावसातच समुद्राला आलेल्या भरतीमुळे काहीच कालावधी मुंबईच्या सखल भागात पाणी साचते आणि मुंबईची तुंबई होते.
याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर जाणवतो. शीव, माटुंगा, कुर्ला, मुलुंड, मशिद, घाटकोपर, कंजूर, चुनाभट्टी, वडाळा, चेंबूर परिसरात रेल्वे रूळ पाण्याखाली जात असल्याने लोकल सेवा ठप्प होते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात ट्रॅकमध्ये पाणी भरू नये म्हणून रेल्वेने ठिकठिकाणी पाणी उपसण्यासाठी १०० हॉर्स पॉवरचे १६६ पंप बसविले आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान ७५ पंप बसविले असून सीएसएमटी-मानखुर्द दरम्यान ३५ पंप बसविण्यात आले आहेत.
- हे पंप उच्च क्षमतेचे असल्याने मिनिटाला लाखो लिटर पाणी ट्रॅकमधून काढता येणार आहे.
- यंदा ट्रॅकमध्ये पाणी भरणार नसल्याने लोकल वाहतूक ठप्प होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.