मुंबई : खासगी कंपनीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचणारे जलदेयक आता टपालाद्वारे पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. एका ग्राहकाला जलदेयक पाठविण्यासाठी महापालिकेला तीन रुपये ८० पैसे खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे तीन कोटी ५५ लाखांचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
मुंबई महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मुंबईकरांना करण्यात येतो. या पुरवठ्यासाठी सुमारे चार लाख १२ हजार जलजोडण्या देण्यात आल्या आहेत. जलजोडणीधारकांकडून महापालिका जल आकार वसूल करीत असते. मात्र, ही जलदेयके ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम यापूर्वी ठेकेदारांना देण्यात आले होते.
परंतु यापुढे जलदेयके टपालाद्वारे ग्राहकांना पाठविण्यात येणार आहेत. टपाल खात्यावर संपूर्ण मुंबईत ९० लाख जलदेयके वितरित करण्याची जबाबदारी आहे. या कामासाठी टपाल खात्याला तीन कोटी ५५ लाख रुपये मोबदला मिळणार आहे. यापूर्वी महापालिका देयकाच्या वितरणासाठी करीत असलेल्या खर्चापेक्षा ही रक्कम कमी असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.