पाण्याचा काळा बाजार
By admin | Published: June 25, 2016 02:27 AM2016-06-25T02:27:45+5:302016-06-25T02:27:45+5:30
स्वत:च्या मालकीची नळजोडणी असूनसुद्धा पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ सध्या कांदिवलीच्या रहिवाशांवर आली आहे. मात्र दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या ज्वेलरी प्लेटिंगच्या
गौरी टेंबकर-कलगुटकर, मुंबई
स्वत:च्या मालकीची नळजोडणी असूनसुद्धा पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ सध्या कांदिवलीच्या रहिवाशांवर आली आहे. मात्र दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या ज्वेलरी प्लेटिंगच्या सुमारे ३५ कारखान्यांना राजरोसपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या सगळ्या प्रकाराकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
कांदिवली पश्चिमच्या गणेश गल्ली क्रमांक ८मध्ये प्लेटिंगचे ३० ते ३५ अनधिकृत कारखाने आहेत. स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात असलेल्या अकबर मंसुरी नामक पाणीमाफियाने पिण्याच्या पाण्याचे पाच कनेक्शन्स घेतलेले आहेत. ज्यातील तीन अनधिकृत आहेत. या कनेक्शनमार्फत तो या ठिकाणी असलेल्या इमिटेशन ज्वेलरी प्लेटिंग तसेच अन्य कारखान्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो. ज्यासाठी कारखाना चालकांकडून दरमहिना ६ हजार रुपये आकारले जातात. तसेच मंसुरीचे सहकारी असलेले प्लंबर हनान आणि राकेश हे या कारखाना चालकांकडून अवघे ५० हजार रुपये आकारून मुख्य जलवाहिकेतून ‘टोचन’ मारून अनधिकृत नळजोडणी देतात. या कारखान्यांना पहाटे ५ ते १० तर रात्री ९ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा केला जात असल्याचे एका महिलेचे म्हणणे आहे. ‘आम्हाला मात्र पिण्याचे पाणी १५ ते २० रुपये कॅन या दराने विकत घ्यावे लागते आणि दरदिवशी हे पाणी आम्ही विकत घेत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचा सल्ला पालिकेकडून दिला जात असतानाच कांदिवलीच्या गणेश गल्लीमध्ये अशा प्रकारे होणाऱ्या पाण्याच्या काळ्या बाजारामुळे स्थानिक प्रचंड संतप्त झाले आहेत.