मुंबई : मेट्रो रेल्वे प्रकल्प तीनचा मोठा फटका मुंबई महापालिकेला बसला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून तब्बल सात वेळा मुख्य जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हजारो लीटर्स पाणी वाया जात असून रहिवाशांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गुरुवारी फोर्ट व आसपासच्या परिसरातील लोकांना या त्रासाला सामोरे जावे लागले. याची गंभीर दखल घेत शुक्रवारी महापालिकेने मेट्रो प्रकल्प व्यवस्थापकाला नोटीसद्वारे खडसावले आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो रेल्वे तीन प्रकल्पांतर्गत ३३.५ कि.मी. भूमिगत मेट्रोचे काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. हे काम सुरू असताना गुरुवारी सायंकाळी सिद्धार्थ महाविद्यालयाजवळ दीडशे मि.मी.ची मुख्य जलवाहिनी फुटली. फोर्ट, बोरा बाजार, मोदी स्ट्रीट आणि बाजार गेट या भागात रात्री आठ ते दहा या वेळेत पाणी येते. मात्र त्याआधीच जलवाहिनी फुटल्याने येथील रहिवाशांना दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी येऊ लागले.मेट्रो रेल्वेच्या खोदकामामुळे जलवाहिनी फुटण्याची ही पहिली वेळ नव्हे. हे काम सुरू झाल्यापासून सात वेळा जलवाहिनी फुटली आहे. या प्रकरणी महापालिकेने मेट्रोला आतापर्यंत ११ लाख ११ हजार रुपये दंड केला आहे. गुरुवारी मेट्रोच्या कामामुळे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेने तत्काळ हाती घेतले. तसेच आणखी एकदा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी नागरिकांना गढूळ पाणी मिळणार नाही, याची काळजी पालिका घेत आहे.मेट्रो ३ प्रकल्पात कुलाबा-वांद्रे-सीप्झ (अंधेरी) ३३.५ कि.मी.चा भूमिगत रेल्वे मार्ग असणार आहे. या प्रकल्पांतर्गत २७ स्थानके असणार आहेत. या प्रकल्पामुळे आतापर्यंत चार वेळा डी.एन. मार्ग तर तीन वेळा जे. टाटा मार्गावर मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाहून गेले.जलवाहिनी फुटल्याप्रकरणी महापालिकेने मेट्रो प्रशासनाकडून ११ लाख रुपये दंड वसूल केला आहे. याआधी ७ आणि ११ आॅक्टोबरला जलवाहिनी फुटून स्थानिक नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा झाला.
मेट्रोच्या खोदकामाचा जलवाहिन्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 1:27 AM