Join us

उलट्या, अतिसारामुळे विक्रोळीकर हैराण; जलवाहिन्या फुटल्यामुळे पाण्याला दर्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 11:09 AM

आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका आणि म्हाडाकडून म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मुंबई : बांधकामांमुळे फुटणाऱ्या जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या आणि त्यातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळेविक्रोळीच्या कन्नमवारनगरमधील नागरिक उलट्या करून अक्षरशः  हैराण  झाले आहेत. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका आणि म्हाडाकडून म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महिनाभर अनेक नागरिक बाटलीबंद पाणी वापरून दिवस ढकलत आहेत. 

कन्नमवारनगरात सध्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. ही कामे सुरू असताना सातत्याने जलवाहिन्या आणि मलनिःसारण वाहिन्या फुटत आहेत. त्यामुळे पिण्याच्या  पाण्यात मलनिःसारण वाहिन्यातील पाणी मिसळते. त्यामुळे पाण्याला दर्प येत असून चवही मातीसारखी लागत आहे. या दूषित पाण्यामुळे अतिसार आणि उलट्या त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या  वाढत आहे. 

१)   कन्नमवारनगर ही  म्हाडा वसाहत असल्याने अजून सेवा वाहिन्यांची  जबाबदारी म्हाडाकडून पालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. 

२)  समस्या उद्भवल्यास रहिवाशांना  या दोन्ही यंत्रणांकडे खेटे घालावे लागत  आहेत. यामुळे आरोग्य जपण्यासाठी अनेक नागरिक उकळून पाणी पीत आहेत.

महिनाभरापासून विकत पाणी :

दूषित पाण्यामुळे अनेक रहिवासी बाटलीबंद पाणी वापरत आहेत. गेल्या महिनाभरापासून दररोज १०० रुपये खर्चून २० लिटरचा पाण्याचा बाटला वापरत आहोत. पाण्याला उग्र वास येत असल्याने चूळ भरण्यासाठीही पाणी तोंडात घ्यावेसे वाटत नाही, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाविक्रोळीपाणी