Join us  

मुंबईमधील जलवाहिन्या झाल्या जीर्ण, अनेक ठिकाणी चढला गंज; ‘वाचडॉग’चा निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 9:47 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गंज चढला आहे. गंजरोधक उपायांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षेसाठी गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी निरीक्षणे वॉचडॉग फाउंडेशनने जलवाहिन्यांच्या पाहणी दौऱ्याअंती नोंदवली आहेत. शहरातील ठिकठिकाणी सुशोभिकरणावर दोन हजार कोटी रुपयांची उधळपट्टी  करण्याऐवजी पालिकेने जलवाहिन्यांच्या सुरक्षेकडे आणि अतिक्रमणे हटविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.

वॉचडॉग फाउंडेशनच्या सदस्यांनी २८ ऑगस्टला आरे कॉलनी ते शहर पी ॲण्ड टी कॉलनीदरम्यान जलवाहिन्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी काही निष्कर्ष नोंदवले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी १३६ वर्षांपूर्वी जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात आले. 

 वाहिन्यांचे ऑडिट करण्याची मागणी-  

१) जलवाहिन्यांच्या दोन्ही बाजूस १० मीटरच्या आत अतिक्रमण करण्यास मनाई करावी, असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यानुसार पालिका अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीही अतिक्रमणे कायम आहेत. 

२) जलवाहिन्यांच्या परिसरात कचरा टाकला जातो. जलवाहिन्यांवरील सिमेंट कोटिंगची झीज झाली आहे. या जाळ्याचा क्षय टाळण्यासाठी गंज-प्रतिरोधक पेंट्सची आवश्यकता असते. मात्र, गंजप्रतिरोधक पेंटचा अभाव दिसून येतो. 

३) जलवितरण वाहिन्यांची देखभाल आणि दैनंदिन तपासणी होते. मात्र ते प्रमाण कमी झाले आहे. जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे त्या फुटण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निष्कर्ष अहवालात मांडले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाणी वितरण करणाऱ्या वाहिन्यांचे ऑडिट करण्याची मागणी संस्थेने केली आहे.

...यामुळे जलवाहिन्या फुटण्याचा धोका-

१) मुंबईतील पाणीपुरवठा प्रणाली आशियातील सर्वात मोठी, तर जागतिक स्तरावरील सातव्या क्रमांकावर आहे. 

२) या जाळ्यात ८० मिमी ते १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या आहेत. चार हजार किमीच्या अंतरात हे जाळे पसरले असून, त्यातून २४ जलाशयात पाणी आणले जाते आणि नंतर शहराला पुरवठा केला जातो. 

३) हे जाळे काँक्रीट किंवा इतर कोटिंग्जद्वारे बाहेरून संरक्षित केले आहे. मात्र अलीकडच्या काळात देखभालीचा अभाव आहे. त्यामुळे जलवाहिन्या फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 

४) त्यामुळे अनेक भागात पाणीकपात लागू करावी लागत आहे. शिवाय जलवाहिन्या फुटल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. 

५) गंजलेल्या जलवाहिन्या हे या मागील प्रमुख कारण आहे, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाणीपाणीकपात