मुंबई : नाल्यांमधील सफाईवर राजकीय पक्ष व नगरसेवक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मात्र नाल्याच्या परिसरातील रहिवाशी डोकेदुखीचे कारण ठरत असल्याचा बचाव आता महापालिका प्रशासनाने सुरु केला आहे. स्थानिक रहिवाशी वारंवार कचरा टाकत असल्याने साफ केलेले नाले पुन्हा भरुन वाहत आहेत. त्यामुळे कचरा टाकताना आढळ्यास त्या रहिवाशांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळेस देण्यात आला आहे. या कारवाईमुळे नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, असा अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो आहे.
मुसळधार पावसात नाले भरुन वाहत असल्याने मुंबईची तुंबापुरी होते. त्यामुळे नाल्यांमधील गाळ तीन टप्प्यांमध्ये वर्षभर काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. एप्रिल महिन्यापासूनच नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सफाईचे काम वेगाने सुरु असल्याचा दावा अधिकारी करीत असताना राजकीय पक्षांनी केलेल्या पाहणीत नालेसफाईची पोलखोल झाली. मात्र खरी परिस्थिती वेगळी असून नाले परिसरातील स्थानिक रहिवाशी वारंवार कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.अशी होणार कारवाई..कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक असलेल्या नाल्याच्या कडेला ‘जाळी’ व ‘फ्लोटिंग ब्रूम’ बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकांना कचरा न टाकण्याबाबत स्थानिक नगरसेवकांची मदतीने विनंती व जनप्रबोधन करण्यात येणार आहे. वारंवार विनंती करुनही कचरा टाकला जात असेल, तर अशा परिसरांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यास अखेरचा उपाय म्हणून संबंधित परिसराचा पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.पालिका मुख्यालयात आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नालेसफाईच्या कामाबाबतही चर्चा करण्यात आली. त्यावेळीस अधिकाऱ्यांनी ही समस्या मांडली. त्यामुळे आयुक्तांनी अशा नाले परिसरावर नजर ठेवण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. क्लीन अप मार्शल नाले परिसरात लक्ष ठेवून असतील. नाल्यामध्ये कोणी कचरा टाकत असल्याचे आढळ्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. मात्र वारंवार सुचना करुनही नाल्यात कचरा टाकणे सुरु राहिल्यास अखेरचा उपाय म्हणून संबंधित परिसराचा पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.कामचुकार अधिकाऱ्यांची खैर नाही...पावसाळापूर्व कामांची छायाचित्रे १२ जून २०१९ पर्यंत ‘अपलोड’ करण्याचे आदेश विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहेत. अपलोड झालेल्या छायाचित्रांमध्ये व सदर ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष कामात तफावत असल्यास नागरिक आपल्या मोबाईलवरुन प्रत्यक्ष परिस्थितीची छायाचित्रे अपलोड करु शकणार आहेत. नागरिकांनी अपलोड केलेल्या छायाचित्रांमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित अधिकाºयावर महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.तक्रारींसाठी अॅप?महापालिकेचे अॅप अधिक व्यापक व लोकाभिमुख करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये नागरी तक्रारींविषयीचे ‘मॉड्यूल’ विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तक्रारी सोबत संबंधित छायाचित्रे ‘अपलोड’ करण्याची सुविधा असेल. तसेच संबंधित तक्रार व छायाचित्र हे ‘ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम’ यास जोडलेले असणार आहे. त्यामुळे तक्रारींचे ठिकाण शोधणे सोपे होणार आहे.नालेसफाईची डेडलाइन पाळण्याची ताकीद...पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असल्याने मान्सूनपूर्व कामं वेगाने सुरु आहेत. नालेसफाईचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. या कामांचा विभागनिहाय व खातेनिहाय आढावा आज आयुक्तांनी घेतला. तसेच डेडलाईननुसारच नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करून घेण्याची ताकीदही अधिकाऱ्यांना दिली आहे.