साडेसात महिन्यांचा तलावांत जलसाठा
By admin | Published: July 24, 2016 03:28 AM2016-07-24T03:28:26+5:302016-07-24T03:28:26+5:30
तलाव क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी लागत असल्याने मुंबापुरीला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत पुढील साडेसात महिन्यांचा जलसाठा जमा झाला आहे.
मुंबई : तलाव क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी लागत असल्याने मुंबापुरीला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत पुढील साडेसात महिन्यांचा जलसाठा जमा झाला आहे. २३ जुलै रोजी सातही तलावांत एकूण ८ लाख ४६ हजार ४८ दशलक्ष लीटर जलसाठ्याची नोंद झाली आहे. गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे सातही तलावांत याच दिवशी ४ लाख ७१ हजार ९३ दशलक्ष लीटर एवढा जलसाठा नोंदवण्यात आला होता.
गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने सातही तलावांतील जलसाठा वर्षभर पुरावा म्हणून मुंबई महापालिकेने पाणीकपात लागू केली होती. मात्र या वर्षी तलावक्षेत्रांत दमदार पावसाची हजेरी लागली आणि तलाव निम्म्याहून अधिक भरले. परिणामी, मागील आठवड्यात महापालिकेने लागू केलेली पाणीकपात मागे घेतली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असून, तलावसाठ्यात उत्तरोत्तर वाढ होणार असल्याने किमान या वर्षीची तरी मुंबईकरांची पाण्याची काळजी मिटणार आहे. दरम्यान, मुंबईसह तलाव क्षेत्रांत पावसाची हजेरी लागत असतानाच राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शिवाय कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून-मधून सरी कोसळत असतानाच पुढील ४८ तासांत शहर आणि उपनगरात पावसाच्या दमदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
२४ जुलै : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२५ जुलै : राज्याच्या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
२६ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.