Join us  

मुंबईतील पाणी संकट आणखी गडद; धरणांमध्ये फक्त १०.६७ टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:04 AM

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होत आहे.

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होत आहे. तसेच १२० किलोमीटर अंतरावरून मुंबईला पाणी वाहून आणताना पाण्याची नासाडी, पाणी गळतीमुळे ३४ टक्के पाणी वाया जाते. यामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एक लाख ५४ हजार ४७१ अर्थात १०.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर  पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. गेल्या जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांना जुलै अखेरपासून १० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने हजेरी लावल्याने मुंबईवरील पाणी कपात रद्द केली होती. यंदाही धरणांमध्ये १०.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून राज्य सरकारने दोन लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केल्याने जुलै मध्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका साठा उपलब्ध आहे. 

मात्र, जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाले नाही, तर पाणी कपातीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य ते नियोजन करून जपून वापर करा, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने नागरिकांना केले आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल पाणी -

१)  यावर्षी पाणीसाठा खालावल्यामुळे पालिकेला राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० दशलक्ष लिटर व भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा मिळाला आहे. 

२) मुंबई महापालिकेकडे एक लाख ५४ हजार ४७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून तो जुलैच्या मध्यापर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. 

३)  मात्र वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला असून जून महिन्यात वरुणराजाचे आगमन झाले नाही तर मात्र मुंबईत जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

२२ मे रोजी धरणांतील पाणी (दशलक्ष लिटरमध्ये)

धरण                            पाणी                          टक्के अप्पर वैतरणा                  ३९३०                          १.७३मोडक सागर                   २३९५३                        १८.५८तानसा                             ४२७५८                       २९.४७मध्य वैतरणा                    २१४८७                       ११.१०भातसा                             ५३१०६                       ७.४१विहार                               ६७३२                        २४.३०तुळशी                              २५०५                        ३१.१३

टॅग्स :मुंबईपाणीकपातपाणी टंचाई