Join us

मुंबईत आणखी काही काळ पाणीकपात; भातसा धरणातील दुरुस्ती लांबली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 7:23 AM

मुंबईला पाणीपुरवठा तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

मुंबई : तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी मुंबईकर मागील काही दिवस पाणीकपातीचा सामना करीत आहेत. मात्र भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अजून काही दिवस सुरू राहणार आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै २०२२ पर्यंत मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन नाही. तरीही भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मागील काही दिवसांपासून १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मालकीच्या भातसा धरणातील हा बिघाड १५ दिवसांमध्ये दुरुस्ती होण्याचा अंदाज होता. परंतु, या दुरुस्तीला आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता असल्याचे जल अभियंता खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना  केले आहे.

झळ टाळण्यासाठी पालिकेचे प्रयोग...

पाणीकपातीची झळ मुंबईकरांना बसू नये, यासाठी वैतरणा धरणातून दोनशे दशलक्ष लीटर साठा अधिक मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उंचावर असलेल्या भागांमध्ये किंवा जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो. अशा भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत सुरू आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी सर्वाधिक दोन हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा भातसा धरणातून केला जातो. सध्या या धरणातून १४०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या या धरणाच्या बांधकाम खर्चाचा वाटा मुंबई महापालिकेने उचलला होता. त्यामुळे कराराप्रमाणे मुंबईसाठी भातसा धरणातून ठरावीक मर्यादेत पाणी सोडले जाते.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका