पाणीकपात मागे पण खरी कसोटी पुढे...

By सीमा महांगडे | Published: August 14, 2023 01:14 PM2023-08-14T13:14:05+5:302023-08-14T13:14:42+5:30

तरीही पाणीबचतीची गरज आहेच...

water cut is over but the real test is ahead | पाणीकपात मागे पण खरी कसोटी पुढे...

पाणीकपात मागे पण खरी कसोटी पुढे...

googlenewsNext

- सीमा महांगडे

गेल्याच आठवड्यात मुंबईकरांना महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय मागे घेत असल्याची खुशखबर दिली. तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. मात्र, तरीही पाणीबचतीची गरज आहेच...

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराला सात तलावांतून पाणीपुरवठा होत असतो. मुंबई शहराला या सर्व जलस्रोतातून ३८५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. यातूनच दरवर्षी मुंबईकरांच्या तहानेची कल्पना यावी. मात्र, पावसाने ओढ दिली की तलाव तळ गाठू लागतात आणि मग मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळू लागते. अशावेळी महापालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय घेतला जातो. 

जून महिन्यात पावसाने मुंबईकडे पाठ फिरवल्याने महापालिकेने १ जुलैपासून पाणीपुरवठ्यात दहा टक्के पाणीकपात केली. परंतु जुलैपासून चित्र बदलले. तब्बल १५ दिवस मुंबई आणि परिसरावर पावसाची कृपावृष्टी झाली व तलावांतील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला. सध्या तरी सर्व तलावांत मिळून ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसाचा रागरंग पाहूनच पाणीपुरवठ्याबाबत पुढील निर्णय घेण्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ या दोन महिन्यांत पाऊस पडून सर्व जलाशयांत १०० टक्के जलसंचय झाला तर पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय पुढे चालू राहील. पाऊस न झाल्यास पुन्हा पाणीकपात करावी लागेल. राज्यातील स्थिती पाहता मुंबई आणि परिसराला पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळेच पाणीबचतीचे महत्त्व अधोरेखित होते.

येथून होतो पाणीपुरवठा

तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. ही बहुतेक धरणे मुंबईपासून किमान १०० किमी वा त्याहून अधिक अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ विहार आणि तुळशी हे दोन तलाव आहेत.
पाणीगळती का होते? 

पाण्याच्या शुद्धीकरणावर व पाणी वितरणावर पालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करते. मात्र पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी यंत्रणा ब्रिटिशकालीन असल्यामुळे जीर्ण झाली आहे. त्यामुळे अनेकदा जलवाहिन्यांना तडे जातात, जलवाहिन्या फुटतात व गळती होते. तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून पाणी चोरीचे प्रकारही घडतात. यामुळे शुद्धीकरण केलेले पाणीही दूषित होते. पाण्याचा अपव्यय होतो. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढते. बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे जलवाहिनी फुटल्यास पालिका त्यांच्याकडून दंड वसूल करते.

वाढती गरज कशी भागवणार? 

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागते. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची गरजही वाढत आहे. २०४१ पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लीटर इतकी होणार आहे; मात्र सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिका विविध प्रकल्पावर काम करीत आहे.

पाणीपुरवठा यंत्रणा कशी?

धरणांतील पाणी मुंबईकरांच्या घराघरात पोहोचण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची अशी त्रिस्तरीय यंत्रणा आहे. धरणातील अशुद्ध पाणी वाहून आणणाऱ्या जलवाहिन्यांना प्राथमिक स्तर व्यवस्था म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी मुंबई शहरात ठिक-ठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात. सेवा जलाशयातून जल वाहिन्यांद्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. या प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात.

 

Web Title: water cut is over but the real test is ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी