गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम
By सचिन लुंगसे | Published: August 1, 2023 01:51 PM2023-08-01T13:51:56+5:302023-08-01T13:54:39+5:30
...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सातत्याने सामोरे जावे लागत असून, १ जुलैपासून लागू करण्यात आलेल्या पाणी कपातीनंतर यात भरच पडली आहे. दुर्दैव म्हणजे श्रीमंतांच्या हायराइज इमारतींमध्ये धो धो पाणी वाहत असताना, दुसरीकडे गरीब अशा श्रमिकांच्या वस्त्यांमध्ये १० नाहीतर ३० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या श्वेतपत्रिकेत काय आहे?
- महापालिकेने २००९ मध्ये पाण्याची श्वेतपत्रिका काढली.
- मुंबईत लोकसंख्या कमी आहे.
- मुंबईत मीटरिंग पूर्ण झालेले नाही.
- सगळ्यांना पाण्याचे मीटर नाहीत.
- शहरात वर्षाची ५० रुपये एवढी पाणीपट्टी भरली जाते.
- इमारत किंवा हॉटेल असो, त्यांना पाणीपट्टी कमी आहे.
- मुंबईत दरडाेई ३०० लीटर पाणी मिळते.
- मुंबईत पाण्याची कपात केली जात नाही.
उपनगरांत नेमकी
काय स्थिती?
- पश्चिम उपनगरात पाणी कपात केली जाते.
- पूर्व उपनगरात वस्त्यांमध्ये पाणी कपात केली जाते.
- पश्चिम उपनगरात सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि येथेच सर्वात कमी पाणी वितरित होते. येथे यंत्रणा नाही, असे कारण पालिकेकडून दिले.
- सर्वाधिक झोपडपट्ट्या या वस्त्यांमध्ये आहेत.
- पूर्व उपनगरात चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, भांडुपचा डोंगराळ परिसर, विक्रोळी पार्क साइट परिसरात पुरेसा पाणीपुरवठा नाही.
- घाटकोपरच्या इमारतींमध्ये पाणी नाही ते रस्त्यांवर आले, असे चित्र पाहण्यास मिळाले नाही.
मुंबईच्या उपनगरातील इमारतींमध्ये कपात केली जात नाही. केवळ येथील वस्त्यांमध्ये पाणी कपात केली जाते, हे वास्तव आहे. पालिकेच्या अभियंत्यांमध्ये आणि त्यांचे नेतृत्व करणा-या लोकांकडून हा दुजाभाव केला जातो आणि त्याच पद्धतीने चावीवाले चावी फिरवत असतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. याला पुरावा म्हणजे, महापालिकेची स्वत:ची कागदपत्रेच.
- सीताराम शेलार, समन्वयक, पाणी हक्क समिती.
पाणीकपात आता लागू झाली आहे. मात्र, आमच्याकडे दोन वर्षांपासून पाण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्यांना पाणी कमी येते त्यांनी स्वतःच्या पैशाने पाण्याच्या पाइपलाइन बदलून घेतल्या आहेत. काही सोसायट्यांनी ४० हजार रुपये खर्च करून मोटार लावल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पाणी मिळते त्यांना खूप मिळते; पण, ज्यांना मिळत नाही त्यांना अजिबातच मिळत नाही.
- साई म्हात्रे, रहिवासी, चारकोप
बहुतांश परिसरात दिवसात एक तासच पाणी येते. पाणीकपात असो किंवा नसो आम्हाला या अडचणींना सामोरे जावे लागते. मोटर लावली तर शेजाऱ्यांची एकमेकांशी भांडणे होतात. शिवाय पाणी यावे म्हणून बहुतांश लोकांनी हॅण्ड पंप लावले आहेत.
- संजय रणदिवे,
रहिवासी, वडाळा
जेव्हा पाणीकपात लागू नव्हती, तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेस पाणी येत होते. मात्र, पाणीकपात लागू झाल्यापासून सकाळी आठ वाजता पाणी येते आणि केवळ २० ते ३० मिनिटे पाण्याचा पुरवठा होतो. पूर्वी दोन वेळेस पाणी येत होते. आता एक वेळेस पाणी येते. पाणी कमी पडल्यामुळे आम्हाला टँकर मागवावा लागतो.
- संदीप पटाडे,
रहिवासी, घाटकोपर पूर्व
झोपडपट्ट्यांच्या परिसरात सकाळी चार ते सहा या वेळेत पाणी येते. तर इमारतींना सकाळी सहा ते साडेसात या वेळेत पाणी येते. पाणीकपात लागू झाल्यापासून आहे त्या अडचणींमध्ये अधिकच वाढ झाली आहे. मुळात बोरीवलीचा काही परिसर हा डोंगरावर आहे किंवा चढणावर आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतत भेडसावतो.
- संदेश कोलपाटे,
रहिवासी, बोरीवली
पाण्याचा दाब कमी असणे ही प्राथमिक समस्या असून, सकाळी नऊ वाजता आलेले पाणी बारापर्यंत राहते. मात्र, हा पाण्याचा पुरवठा पुरेसा नाही. धारावीतील पाण्याचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आम्ही पालिकेसोबत पत्रव्यवहार केला असून, झोपडपट्टीचा पाण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढावा, अशी विनंती केली आहे.
- वसंत नकाशे,
माजी नगरसेवक, धारावी
प्रशासकीय राजवटीला अडचणींची कल्पना नाही पाणीकपात दहा टक्के असली तरी शहराच्या अनेक भागात मुळातच पाणीपुरवठा कमी असल्याने त्या कपातीने त्यात भरत पडली. बोरीवली पूर्वेकडील मागठाणे परिसरात अनेक इमारतींना वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दहा टक्के कपातीनंतर तर तास दोन तास पाणी येथील रहिवाशांना मिळत आहे. पत्रकारांचे निवास असलेल्या अक्षर पत्रकार सोसायटीचाही त्यात समावेश आहे. अधिकाऱ्यांना जनतेच्या अडचणींची कल्पना नाही. त्यामुळे अधिकारी पाणी कपात मागे घेण्यास तयार नाहीत.
- प्रभाकर नारकर, अध्यक्ष, मुंबई जनता दल