- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अतिक्रमणामुळे तानसा जलवाहिनीला धोका निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण हटवले, तरी परत नवीन झोपड्या तयार होतात. यामुळे अखेर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुमारे ३९ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर आणण्यासाठी जल अभियंता खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारचा हा देशातील सर्वात मोठा ट्रॅक ठरू शकेल, असा दावा पालिकेने केला आहे.मुंबईच्या हद्दीत सुमारे ३९ किलोमीटर लांबीची तानसा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचा एक भाग हा मुलुंड ते धारावी असून, दुसरा भाग हा घाटकोपर ते शीव असा आहे. ही जलवाहिनी महापालिकेच्या टी, एस, एम पश्चिम, एन, एल, एफ उत्तर, के पूर्व, एच पूर्व, एच पश्चिम व जी उत्तर या १० प्रशासकीय विभागातून जाते. यामध्ये मुलुंड, भांडुप, सहार, वाकोला, हुसेन टेकडी, खार पूर्व, माहिम, धारावी, घाटकोपर, कुर्ला पूर्व, आणिक डेपो आदी परिसरांचा समावेश होतो. यापैकी जलवाहिनीच्या दुतर्फा असणाऱ्या १०- १० मीटरच्या संरक्षित परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार, नऊ प्रशासकीय विभागांपैकी टी, एस, एन, एम पश्चिम व जी उत्तर या पाच प्रशासकीय विभागांच्या हद्दीतील तानसा जलवाहिनीच्या परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित एल, एफ उत्तर, के पूर्व, एच पूर्व या चार प्रशासकीय विभागांमध्ये काम सुरू आहे.सायकल व जॉगिंग ट्रॅक याचा वापर करणे नागरिकांना सुलभ होण्याच्या दृष्टीने, आवश्यक तेथे संरक्षक भिंतीला प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी प्रस्तावनुरूप कृती आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रमुख तानसा जलवाहिनीची सुमारे ३९ किलोमीटर लांबी लक्षात घेतल्यास, प्रस्तावित ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ हा उपलब्ध माहितीनुसार, या प्रकारचा देशातील सर्वात मोठा ट्रॅक ठरू शकेल, असा दावा महापालिकेने केला आहे.तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा असणारी १०- १० मीटरची जागा मोकळी झाल्यानंतर नवीन अतिक्रमण उभे राहू नये, यासाठी जलवाहिनीच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर, या जागेचा चांगला उपयोग होऊन परिसरातील नागरिकांनाही त्याचा फायदा व्हावा, या दृष्टीने आता या जागेत सायकल व जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करताना जलवाहिनीच्या देखभालीसाठी आवश्यक असणारी जागा मोकळी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच विमानतळ प्राधिकरण, भांडुप संकुल, खासगी जागा यासारख्या जागा प्रस्तावित जॉगिंग व सायकल ट्रॅक बांधकामातून वगळण्यात येणार आहेत.- रमेश बांबळे, उपायुक्त
अतिक्रमणामुळे जलवाहिनीला धोका
By admin | Published: June 17, 2017 2:27 AM