Join us

पाणीप्रश्नी स्वपक्षीय नगरसेविकेने शिवसेनेलाच धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 3:00 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जलसाठा आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी जलसाठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, दक्षिण मुंबईतील कुलाब्यासारख्या उच्चभ्रू विभागात सर्वाधिक कमी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सुजाता सानप यांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही कोणी ऐकत नाही, असा संताप व्यक्त करीत, त्यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच स्थायी समितीमध्ये घरचा अहेर दिला. पाणीकपातीची झळ सर्वच विभागांना बसत असल्याने, या प्रकरणी विशेष बैठक बोलाविण्याचा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतला.दिवाळी संपल्यानंतर १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. काही विभागांमध्ये ही कपात १० टक्के नव्हे, तर ३० टक्के असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. दक्षिण मुंबईत मात्र पाणी पुरवठा केला जात नसल्यासारखीच परिस्थिती आहे.या विभागातील पाण्याची समस्या काही केल्या सुटत नसून, आता टँकरही मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत विदर्भापेक्षाही जास्त पाण्याचा दुष्काळ असल्याचा संताप व्यक्त करीत, आपली तक्रार कोणीच ऐकत नसल्याची नाराजी सानप यांनी व्यक्त केली. आॅक्टोबर महिन्यात मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यातच पाणी येत नव्हते. त्यानंतर, या भागात पाण्याच्या वेळा बदलल्या. मात्र, काहीही उपयोग झालेला नाही. कधी-कधी पाणी पंधरा मिनिटांसाठी येते आणि जाते. अनेक ठिकाणी पाण्याच्या वेळा बदलल्यामुळे रात्रभर जागून महिलांना पाणी भरावे लागत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.टँकरदेखील मिळत नसल्यामुळे लोकांनी करायचे काय? पाणीप्रश्न सुटत नसल्याने विभागात फिरणेही मुश्कील झाले आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.>‘प्रस्तावांना मंजुरी, प्रत्यक्ष काम होतच नाही’पाणीपुरवठा सुधारण्यासाठी कामाचे प्रस्ताव मंजूर होतात, पण कामे मात्र होत नाहीत. मग ठेकेदार करतात काय? असा सवाल मंगेश सातमकर यांनी केला. सायनमध्ये प्रतीक्षानगर, जय महाराष्ट्रनगरमध्ये पाणी कमी येत असल्याचे त्यांनी सांगितले.