दक्षिण मुंबईतील पाणीप्रश्न महापालिकेत पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:00 AM2018-11-03T01:00:04+5:302018-11-03T01:00:23+5:30
महासभेत गोंधळ; विरोध पक्षांचा सभात्याग, मुख्य जलअभियंता गैरहजर
मुंबई : अपुऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी आहे. याची झळ आतापासूनच मुंबईतील काही भागांना प्रामुख्याने दक्षिण मुंबईला बसत आहे. यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक होत पाण्याचा मुद्दा पालिका महासभेत आज चर्चेस आणला. मात्र, पालिका सभागृहात चर्चा सुरू असतानाही मुख्य जलअभियंता गैरहजर असल्याने विरोधी पक्षांनी झटपट सभा तहकुबी मांडण्याची मागणी केली. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मागणी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ऐन दिवाळीत महापौरांच्या निवासस्थानी मोर्चा आणण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
मुंबईतील पाणीटंचाईवर पालिकेच्या महासभेत आज ६६ ब अन्वये चर्चा करण्यात आली. मुंबईतील अनेक भागात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पालिकेने छुपी पाणी कपात केली आहे. अपुºया पावसाअभावी भविष्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, पालिकेकडे अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण कमी होऊन भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या अधिकच जटिल होत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा नाहक अपव्यय होती. त्यामुळे पालिकेने पाण्याचे योग्य नियोजन करावे. विहिरी, झरे पुनरुज्जीवित करावे, पावसाचे पाणी साठविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी या चर्चेत सहभागी होत केली.
विरोधकांचा सभात्याग
पाणीप्रश्नावर पालिका महासभेत चर्चा सुरू असतानाही जलाभियंता गैरहजर असल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. अधिकाºयाच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूब करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली. मात्र, महापौरांनी सभा तहकुबी नामंजूर केल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
काँग्रेस नेते महापालिकेत
दक्षिण मुंबईत पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, याबाबत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.