सचिन लुंगसे
मुंबई : पिण्यासाठी व जेवणासाठी कमीत कमी २० लीटर शुद्ध आणि सुरक्षित पाणी प्रत्येक माणसाला मिळणे गरजेचे आहे. त्यात जीवजंतू, घातक रसायने आणि किरणोत्सर्गाचा समावेश नसावा. पाणी वितरणात भेदभाव नसावा. कामाच्या ठिकाणी, संस्थांमध्ये स्वच्छ पाणी सहज सुलभ मिळणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात महानगरी मुंबईत विदारक स्थिती आहे.
मुंबईत नवी नळ जोडणी घ्यायची असेल तर अडचणींना सामोरे जावे लागते. पाच घरांच्या नळ जोडणीसाठी महापालिकेला अदा करावे लागणाऱ्या ५०० रुपयासोबत पाईप आणि इतर खर्च पकडून १० हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र गैरप्रकारांमुळे पाच घरांच्यासाठीच्या एका नळजोडणीला नागरिकांना तब्बल ३५ हजार रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेने याकामी सरकारी प्लंबर नेमला आणि त्याने नळ जोडणीच्या ठिकाणाचा सर्व्हे करत जोडणी दिली तर साहजिकच हा खर्च कमी होईल.
मुंबईला हजार लीटर पाणी केवळ सव्वाचार रुपयांत मिळते. महापालिका याकरिता १२ ते १५ रुपये खर्च करते. पाणीपुरवठा असलेल्या जलस्रोतातून दररोज पाणी जवळपास ४०० किलोमीटर लांबीच्या जाळ्याद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणले जाते. पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी भांडूप जलशुद्धीकरण केंद्र, पांजरापूर येथे साठवले जाते. त्यानंतर २७ जलाशयांमार्फत पाण्याचे शहर आणि उपनगरांत वितरण केले जाते. मात्र हे वितरण नीट होत नाही, अशी टीका जलतज्ज्ञ करत आहेत.
पाणीपुरवठा करणारी यंत्रणा १८४५ सालापासून अस्तित्वात
गळतीचे प्रमाण २५ ते ४० टक्के.
गळतीमुळे ८६२ ते १३०० दशलक्ष लीटर पाणी वाया.
प्रत्येक व्यक्तीला १५० लीटर पाण्याची गरज.
झोपड्यांमध्ये दर माणसी दररोज ४० लीटरपेक्षाही कमी पाणी मिळते.
प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन प्रतिव्यक्ती १३० लीटर पुरविण्याचे धोरण.
मुंबईची पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ४५० दशलक्ष लीटर आहे.
प्रत्यक्षात मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
गळती, बेकायदा जोडणी, चोरी, मीटरमधील तफावत इत्यादी कारणांमुळे २५ टक्के पाण्याचा हिशेब लागत नाही.
मुंबईची लोकसंख्या २०११ साली : १.२४ कोटी
मुंबईची लोकसंख्या २०२१ पर्यंत : १.३० कोटी
मुंबईची लोकसंख्या २०३१ पर्यंत : १.५० कोटी
कोरबा मिठागर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, मालाड, मालवणीसह दाट लोकवस्ती आणि झोपड्या असणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी चोरुन वापरले जाते.
मुंबईचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध
उपाययोजनांमुळे मुंबईच्या पाण्याच्या शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वरळी, करी रोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्या अंती मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुध्द असल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१३ ते २०२० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलल्या आहेत. तर १ लाख ७५ हजार ठिकाणची गळती शोधून दुरुस्ती करण्यात आली आहे. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९,९०८ सेवा जोडण्या बदलण्यात आल्या. विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले.
या तलावातून मुंबईला पाणीपुरवठा
तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा, मध्य वैतरणा.