घाटकोपर, विक्रोळी, भांडुपला भूमिगत टाक्यांमधून पाणी; महापालिका करणार ८९ कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:55 AM2023-12-20T09:55:36+5:302023-12-20T09:56:08+5:30
पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप भागातील टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांची पाणी टंचाईपासून मुक्तता होणार आहे.
मुंबई : पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप भागातील टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांची पाणी टंचाईपासून मुक्तता होणार आहे. या भागांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिका २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची भूमिगत टाकी, पंपिंग स्टेशन बांधणार असून जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरळीत करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका ८९ कोटी ४२ लाख रुपये खर्च करणार आहे.
घाटकोपर, विक्रोळी, भांडुपच्या काही भागात डोंगराळ वस्त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र ही ठिकाणे उंचावर असल्याने या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. डोंगराळ वस्त्या असल्याने पाण्याला पुरेसा दाब नसतो. नव्या प्रकल्पामुळे भविष्यात ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
घाटकोपर, विक्रोळी भांडुप येथील जुन्या जलवाहिन्या बदलत विविध व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. विक्रोळी पार्क साईट सी कॉलनीजवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात २२ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येणार असून टाकीत पाणी साठवण करण्यासाठी विविध व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पाव्यतिरिक्त ही कामे देखील होणार :
पूर्व उपनगरातील परिमंडळ सहामधील घाटकोपर (पश्चिम) विक्रोळी (पश्चिम) येथील डोंगरावर असलेल्या आनंदगड, पंचशील सोसायटी व रामनगर परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिन्या.
पूर्व उपनगरातील परिमंडळ ६ मधील भांडुप जलाशयापासून घाटकोपर भांडुप विभागातील पाणीपुरवठ्याचे विभाजन करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री मार्गावर ९०० - ७५० मिमी व्यासाची जलवाहिनी.
घाटकोपर (पश्चिम) व विक्रोळी (पश्चिम) येथील लोअर डेपो पाडा - सागर नगर या उंचावर वसलेल्या लोकवस्तीसाठी पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलण्याचे काम.