मुंबईची तहान भागविण्यासाठी अप्पर वैतरणा, भातसातून पाणी; पालिकेचे सरकारला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 11:27 AM2023-05-25T11:27:36+5:302023-05-25T11:27:52+5:30
अतिरिक्त पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे दिवसेंदिवस तळ गाठत असून, या तलावात केवळ १५.५७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईत आधीच उकाडा, त्यात पाऊसही उशिरा पडणार असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. येत्या काही दिवसांत मुंबईची तहान पाहता, हे पाणी अपुरे पडणार असल्याने, अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. दरम्यान, या धरणातून अतिरिक्त पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. उन्हामुळे या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून, या धारणांमध्ये केवळ १५.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, हे पाणी सरासरी ३० दिवस पुरेल, अशी स्थिती आहे. <
गेल्यावर्षी याचदिवशी २०.३० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. राज्य सरकारच्या जागेवर बांधण्यात आलेली भातसा व अप्पर वैतरणा या धरणांमधील शिल्लक पाणी मिळावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने केल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.