Join us

चेंबूूरमध्ये पाण्यासाठी मोर्चा

By admin | Published: July 12, 2015 12:36 AM

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महापालिकेकडून करोडोंचा निधी खर्च केला जातो. मात्र तरी देखील चेंबूरमधील पांजरापोळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून

मुंबई: शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महापालिकेकडून करोडोंचा निधी खर्च केला जातो. मात्र तरी देखील चेंबूरमधील पांजरापोळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची मोठी टंचाई आहे. या समस्येकडे पालिका आणि स्थानिक आमदार कानाडोळा करत असल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आमदार तुकाराम काते यांच्या घरावर अलिकडेच मोर्चा काढला.पांजरापोळ परिसरातील अनेक भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाण्याची गंभीर समस्या आहे. दिवसभरात याठिकाणी केवळ १५ मिनिटेच पाणी येत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरात किमान दोन हजार लोकवस्ती आहे. मात्र वेळेवर पाणी येत नसल्याने या रहिवाशांना दिवस-रात्र पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. येथील बहुतांश परिसर हा डोंगराळ भाग असल्याने याठिकाणी सायकल अथवा हाता वाहून नेत पाणी भरावे लागत आहे. रहिवाशांचा सगळा वेळ पाणी भरण्यातच जातो. हा संपूर्ण परिसर झोपडपट्टी असल्याने या भागातील रहिवाशी हे रोजंदारीवर काम करणारे आहेत. त्यांना दिवसाला शंभर ते दीडशे रुपये मिळतात. त्यात पाण्यासाठी पूर्ण दिवस घालवल्याने कमवायचे काय आणि खायचे काय? असा संतप्त सवाल देखील हे रहिवासी उपस्थित करत आहेत. काही घरातील शाळकरी मुले देखील शाळेत न जाता पाणी भरण्यात संपूर्ण दिवस घालवतात. मात्र त्यानंतरही त्यांना पुरेसा पाणी मिळत नाही. रहिवाशांनी याबाबत पालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला. निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांचे उमेदवार येथे मत मागण्यासाठी येतात. तेव्हा पाणी समस्या सोडवण्याचे केवळ आश्वासन मिळते. मात्र गेल्या अनेक वर्षांत ही समस्या जैसे थे आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील आमदार तुकाराम काते यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आमदार होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटूनही समस्या न सुटल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. (प्रतिनिधी)