Join us

पाणीटंचाईची तीव्रता वाढतीच

By admin | Published: April 08, 2015 10:51 PM

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हापरीषद प्रशासन संवेदनशील

दिपक मोहिते, वसईपालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हापरीषद प्रशासन संवेदनशील नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वसई विरार उपप्रदेशातही पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या योजनांचे प्राथमिक काम अद्याप मार्गी न लागल्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता आहे.वसई विरार उपप्रदेशातील महानगरपालिका हद्द व ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा याकरीता गेल्या काही वर्षापासून सतत प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन डहाणू तालुक्यात सुसरी नदीवर धरण उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राज्यशासनाकडे पाठवला व त्यास मंजुरीही मिळाली. या योजनेअंतर्गत येणाऱ्या जमिनीकरीता महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाला १६ कोटी रू. चा निधी अदा केला आहे. सध्या भुसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उपप्रदेशाला प्रतिदिन १८० द. ल. ली. पाणी मिळू शकते. परंतु येथे धरण बांधण्यास स्थानिक जनतेचा विरोध असल्यामुळे या योजनेचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. सदर योजना मार्गी लागण्यात अनेक अडथळे येत असल्यामुळे प्रशासनाने २ वर्षापुर्वी देहर्जे नदीतून पाणी उचलण्याचा निर्णय घेतला. सुमारे ३०० कोटी रू. ची ही पाणीपुरवठा योजना असून वनजमीनीच्या हस्तांतरणाकरीता प्रशासनाने १५० कोटी रू. वनविभागाला अदा केले आहेत. या योजनेतून प्रतिदिन अडीचशे द. ल. ली. पाणी उपलब्ध होेऊ शकते.सध्या उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. तर उसगाव धरणातील पाणी केवळ शेतीसिंचनासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने भातसा नदीचे पाणी शिरवली बंधाऱ्यात घेऊन ते शहरी भागाला पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. सूर्या धरणामधील पाण्याचा साठा पुरेशा प्रमाणात असून वसई विरार उपप्रदेशाला आवश्यक असलेला साठा दररोज उचलणे कठीण होत आहे. त्यामुळे उपप्रदेशाच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईची तीव्रता सतत वाढत आहे.