दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 6, 2025 18:59 IST2025-01-06T18:58:31+5:302025-01-06T18:59:33+5:30
रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर धडकला.

दिंडोशीतील पाणी प्रश्न पेटला!; शिवसेनेचा (यूबीटी) पी उत्तर विभाग कार्यालयालयावर घागर मोर्चा
मुंबई : दिंडोशीत अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज महापालिकेच्या पी उत्तर पूर्व विभाग कार्यालयावर आज घागर मोर्चा काढला. यात बहुसंख्यसेने ग्रामस्थ सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, पाणी नाही नळाला, महापालिका कशाला?, कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय, हाय हाय, महापालिका हाय हाय आदी घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला होता. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रिकामे हंडे कळशा घेऊन टाळ्या वाजवत, घोषणा देत हा मोर्चा महापालिका पी उत्तर पूर्व कार्यालयावर धडकला.
दिंडोशीतील पाणी टंचाई विरोधात आज सकाळी ११ वा. मालाड (पूर्व )आप्पा पाडा रिक्षा स्टँड येथून दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना जाणवणाऱ्या पाणी समस्येबाबत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका कार्यालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढला व या मोर्चाच्या अग्रस्थानी राहून आमदार सुनिल प्रभु यांनी या महापालिका प्रशासना विरोधातील जनप्रक्षोभाचे नेतृत्व केले.
या जन प्रक्षोभ मोर्चात विधानसभा संघटक प्रशांत कदम, रीना सुर्वे, पूजा चौहान, माजी उपमहापौर अँड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, भाई परब, गणपत वारीसे, उपविभाग संघटक रुचिता आरोसकर,विद्या गावडे, सानिका शिरगांवकर सर्व महिला पुरुष समन्वयक शाखा प्रमुख,शाखा संघटक युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच विभागातील असंख्य नागरिक आणि मुख्यत्वे महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी पाणी पुरवठा पूरेशा प्रमाणात होत होता. पुरेसा पाऊस झाल्याने मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी कपात मागे घेतल्यानंतर मुंबई महानगर पालिका प्रशासनाने मे महिन्यांत लागू केलेली पाणी कपात देखील मागे घेतली होती.मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दिंडोशी विधानसभा क्षेत्रात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून पाण्याच्या वेळा देखील निश्चित नाहीत तसेच अपूरा पाणी पुरवठा होतो यामुळे पाण्यावरुन नागरीकांचे आपापसात भांडण होते.त्यातच पाणी आल्यानंतर दहा ते पंधरा मिनीटे पाणी पुरवठा होतो व त्यांनतर एक ते दीड तास पाणी पुरवठा होतच नाही आणि काही वेळाने पुन्हा थोडे पाणी येते व जाते यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
या गंभीर विषयासंदर्भात आमदार सुनिल प्रभु यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त विशेष अभियांत्रिकी, जल अभियंता, सहाय्यक आयुक्त पी/उत्तर यांचे सोबत बैठका घेऊन नागरिकांची समस्या या आधी अनेक वेळा मांडली होती. या प्रत्येक वेळी सर्वांकडून सुरळीत पाणी पुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू बैठक झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवस सुरळीत पाणी पुरवठा होऊन व त्यानंतर पुनश्चः खंडीत पाणी पुरवठ्याचे प्रकार पुन्हा सुरु होतात, यामुळे पुरेसा पाणी पुरवठा न मिळाल्याने व वारंवार आपापसात भांडण झाल्याने नागरीकांच्या मनात महापालिका प्रशासनावर प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होतो याबाबत अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरवा करुन देखील समस्येचे समाधान होत नाही. यामुळे दिंडोशी मधील जनता त्रस्त असून दिवसेंदिवस जनप्रक्षोभ वाढत गेला अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.
आप्पा पाडा, क्रांतीनगर, प्रथमेश नगर, दुर्गा नगर या परिसरात पाणीपुरवठा योग्य दाबाने पूर्ववत करा रामनगर, दुर्गा नगर टेकडी परिसरात येणारे दूषित पाणी यावर युद्ध पातळीवर उपाययोजना करा, तानाजी नगर, बाणडोंगरी, कोकणी पाडा, बासूवाला कंपाऊंड, पठाणवाडी परिसरात पाण्याचा दाब वाढवा व पूर्ववत करा. दत्तवाडी, आनंदवाडी भागात पाणीपुरवठा सुरळीत करा, संतोष नगर, बीएमसी कॉलनी येथे ए वन स्वीट मार्ट येथे पाण्याची टाकी बांधा, पाणी लिफ्टिंगसाठी असलेले जुने पंप बदलून जास्त कॅपॅसिटीचे नवीन पंप बसवा जेणेकरून संतोष नगर, श्रीकृष्ण नगर बीएमसी कॉलनी, दिंडोशी हाऊसिंग बोर्ड, नागरी निवारा वसाहत येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल. त्याच बरोबर जामृती नगर आंबेडकर नगर या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवर बसलेल्या झोपड्यांना देखील सुरळीत पाणीपुरवठा करता येईल याबाबतची चर्चा झाली.
यावेळी प्रशासनाने आश्वासक उत्तरे दिली .आमदार सुनील प्रभू असे म्हणाले की, "हा जनप्रक्षोभ मोर्चा आहे यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिका विभाग कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर यास पोलीस प्रशासन सरकार आणि महापालिका प्रशासन असेल असा इशारा यावेळी आमदार सुनील प्रभू यांनी दिला.