मुरुड : मुरुड तालुक्यातील श्री सदस्यांनी मंगळवारपासून जंजिरा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू केली. बुधवारी उमेशदादा धर्माधिकारी यांनी किल्ल्यावर प्रत्यक्ष देऊन पाहणी केली. किल्ल्यातील तलाव स्वच्छ करण्यात आल्याने हे पाणी आता पिण्याजोगे झाले आहे. त्यामुळे पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.किल्ल्यावर श्री सदस्यांना सूचना करताना उमेशदादा धर्माधिकारी यांनी सांगितले की, सफाई करताना मिळणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. भविष्यात जंजिरा वैभवाच्या शिखरावर राहून मुरुडकरांना पर्यटन विकासाचे सर्व मार्ग खुले होतील, या भावनेने स्वच्छता मोहीम अधिक यशस्वी करावी, जंजिऱ्याचे पालटलेले रूप पर्यटकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. नबाबकालीन विहीर सापडलीजंजिरा जलदुर्गची श्री सदस्यांनी युद्धपातळीवर स्वच्छता करताना मंगळवारी १५-१६ व्या शतकात निर्माण झालेली विहीर आढळली. किल्ल्यावर वाढलेली झाडेझुडपे तोडल्यानंतर विहीर दिसली. ही विहीर सुमारे ५० ते ६० फूट खोल असून या विहिरीचे मुख चौथऱ्याचे चौकोनी आहे. जंजिरा किल्ला खाऱ्या समुद्रात उभा असूनही या विहिरीतील व अन्य तलावातील पाणी गोड असल्याचे अनेकांना जाणवले. ही मोहीम गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे. (वार्ताहर)
जंजिरा किल्ल्यावरील पाणी झाले पिण्याजोगे
By admin | Published: April 08, 2015 10:29 PM