Join us

खालापूरचा तलाव लवकरच गाळमुक्त होणार

By admin | Published: May 24, 2014 12:53 AM

शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाणीटंचाईने उग्र रुप धारण केलेले आहे, मात्र पाण्याच्या या टंचाईला आवर घालण्यासाठी गावातील तलावांचीच मदत होऊ शकते हे पुन्हा एकदा समोर येणार आहे.

खालापूर : शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाणीटंचाईने उग्र रुप धारण केलेले आहे, मात्र पाण्याच्या या टंचाईला आवर घालण्यासाठी गावातील तलावांचीच मदत होऊ शकते हे पुन्हा एकदा समोर येणार आहे. तलावातील गाळ काढून पाणवठे, तलाव पाणीटंचाई कमी करु शकतात हे खालापूर येथील तहसिलदारांनी दाखवून दिले असून त्यासाठी गाळ काढण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी तलावातील गाळ नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे . खालापूर या तालुका ठिकाणी खालापूर गावासाठी मुंबई-पुणे महामार्गानजीक तलाव आहे, पण तलावातील गाळ न काढला गेल्याने मार्च ते मे महिन्यात तलावात पाण्याचा साठा शिल्लक राहत नाही. पावसाळ्यानंतर हळूहळू तलावातील पाणी कमी होते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात तलावात पाणीच शिल्लक राहत नसल्याने पाण्यासाठी वंचित रहावे लागते. पाणी टंचाईशी सामना करावा लागत असताना एखादा शासकीय अधिकारी काय करु शकतो हे खालापूर तहसीलदार दीपक आकडे यांनी दाखवून दिले आहे. त्याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे आणि उपविभागीय अधिकारी राजेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथील गाव तलावातील अनेक वर्ष साचलेला गाळ काढण्यास सुरु वात केली आहे . तहसीलदार दीपक आकडे यांनी स्थानिक गावकर्‍यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून एका स्वयंसेवी संस्थेचा गाळ काढण्याच्या कामात सहभाग घेत तलाव स्वच्छ मोहीम हाती घेतल्याचे तहसिलदारांनी सांगितले. गाळ काढल्याने येणार्‍या वर्षी पाणी साठवणूक क्षमता नक्कीच वाढणार असल्याने उन्हाळातही पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतकर्‍याला वाटल्यास स्वखर्चातून गाळ काढण्याची अनुमती दिली जाईल, असे सांगताना अधिकाधिक शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे . जिल्हाधिकारी यांनी मेपर्यंत पाणी साठा राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)