Join us

खोपोलीतील घरांमध्ये पाणी

By admin | Published: August 01, 2014 3:35 AM

जुलैच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा खोपोलीला फटका दिला आहे.

खालापूर : जुलैच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा खोपोलीला फटका दिला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने शहराच्या काही सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक चिंतेत आहेत तर तालुक्यात देखील पावसाचा जोर राहिल्याने नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. सलग पाचव्या दिवशीही जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारपासून पावसाचा धुमाकूळ अजून सुरु असल्याने मुसळधार पावसाने खोपोली, खालापूरमध्ये जनजीवन विस्कळीत केले आहे. रात्रीपासून पावसाची जोराची संततधार कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. याचा फटका खोपोली शहराच्या कृष्णानगर भागाला चांगलाच बसला आहे. रहिवासी गाढ झोपेत असताना पाणी शिरायला सुरुवात झाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. सजग रहिवाशांनी घरातील समान उंचावरील जागेवर हलविण्यास सुरुवात केली. गुलशन अपार्टमेंट या इमारतीमधील रहिवाशांना याचा फटका बसला आहे. सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठीलकर यांच्या घरात देखील दोन फूट पाणी घुसले होते. दरवर्षी मुसळधार पावसात पाताळगंगा नदीला पूर आल्यानंतर ते पुराचे पाणी थेट या भागातील घरांमध्ये घुसत असल्याने पावसाळ्यातील रात्री रहिवाशांसाठी चिंतेच्या असून रहिवाशांचे चांगलेच नुकसान झाले आहे. मागील वेळी पंचनामे करण्यात आले मात्र मदत अद्याप मिळाली नसल्याची माहिती गुरु नाथ साठीलकर यांनी दिली. खालापूर तालुक्यालाही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दोनवत, कलोते, आतकरगाव धरणांच्या पाणी साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली असून धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाताळगंगा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सारसन, खालापूर गाव या ठिकाणी नदीपात्रातील पुराचे पाणी शेतीमध्ये साचले आहे. (वार्ताहर)