मुंबई : मुसळधार पावसात मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचीही सुटका झाली नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगरमध्येही मंगळवारी गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनाच नव्हे, तर ठाकरे कुटुंबीयांनाही घराबाहेर पडणे अशक्य झाले होते.कलानगर येथे पाणी तुंबण्याची समस्या अनेक वर्षांपासूनची आहे. या सखल भागात पाणी साचून राहू नये, यासाठी येथे भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे काम करण्यात येणार आहे. मात्र, वरळी सागरी सेतुवरून या परिसरापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याने, पर्जन्य जलवाहिनीचे काम लांबणीवर पडले. सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे या परिसरातील पाणी साचून राहिले. हे पाणी वाहून जाण्याचा मार्ग नसल्यामुळे त्याचा जलदगतीने निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे सरकारी वसाहत, शास्त्री वसाहत आणि एमआयजी ग्राउंड परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाऊस ओसरल्यानंतर दुपारी येथील पाण्याचा निचरा हळूहळू होऊ लागला.आदित्य ठाकरेंची कोंडीशिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देणार होते, परंतु मातोश्रीबाहेर पाणी साचल्यामुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. काही वेळाने शिवसेना नगरसेवकांच्या मदतीने आदित्य ठाकरे कलानगरमधून बाहेर पडू शकले.
महापौर अडचणीतमहापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबले नसल्याचा दावा सोमवारी केला होता. मात्र, आजच्या परिस्थितीनंतर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. महापौरांनी आता तरी मुंबईचा आढावा घ्यावा, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. महाडेश्वर यांनी गेल्या आठवड्यात येथे पालिका अधिकाऱ्यांसह काही भागांची पाहणी केली होती. तेथे अधिकाºयांबरोबर त्यांचा वाद झाल्यानंतर, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंता विद्याधर खणकर यांना मारहाण केली होती. यामुळे वाद उभा राहिला होता.
नेटक-यांनी उडविली खिल्लीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या अंगणात पाणी साचल्यावरून नेटकरीही शिवसेनेवर बरसले. ‘किमान स्वत:चे कलानगर तरी वाचवून दाखवा’ असा टोला त्यांनी मारला.नवाब मलिक यांच्या घरातही पावसाचे पाणीसोमवारी रात्री शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील घरात गुडघाभर पाणी साचले होते. नवाब मलिक यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सीएमओ महाराष्ट्र आणि शिवसेनेला टॅग केले. शिवाय ‘करून दाखवलं’ अशी टॅगलाइन दिली होती.