Join us

मेट्रो ३ स्थानकाच्या प्रवेशद्वारात पाणीगळती; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 8:34 AM

याचा व्हिडीओ समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्रवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकाला परतीच्या पावसाचा फटका बसला. या मेट्रो मार्गिकेवरील सांताक्रुझ स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पहिल्याच पावसात गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातून पावसाचे पाणी पायऱ्यांवरून थेट स्थानकामध्ये येत असल्याचा प्रकार गुरुवारी घडला होता. याचा व्हिडीओ समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्रवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. मेट्रो ३ मार्गिकेवरील गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड घडून गाड्यांना विलंब झाल्याच्या तक्रारी आल्या असतानाच आता स्थानकात पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सांताक्रुझ मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील कॅनोपीचा गटर ओव्हरफ्लो झाला होता. त्यातून पावसाचे पाणी प्रवेशद्वारातून आतमध्ये गळत होते. तसेच हे पाणी सरकत्या जिन्यांवरही पडत असल्याचे व्हिडिओतून समोर आले होते. 

यापुढे ही गळती पुन्हा होणार नाही

याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता या गळतीवर तातडीने काम करून योग्य काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ही गळती पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. तसेच या परतीच्या मुसळधार पावसाचा मेट्रोच्या ऑपरेशनवर कोणताही परिणाम झालेला नसून मेट्रो सुरळीत सुरू होती, असे एमएमआरसीकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :मेट्रो