Join us

जलवाहिन्यांना गळती

By admin | Published: July 01, 2014 11:20 PM

जुनाट जलवाहिनी त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्टीधारक पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करीत आहेत

पनवेल : जुनाट जलवाहिनी त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्टीधारक पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत प्रभावी उपाययोजना होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकारामुळे एमजेपीचे अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज एका ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे.जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरु जलशुध्दीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान २८ वर्षापूर्वी १५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या वाहिनीद्वारे पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व आजूबाजूच्या १९ गावांतील सुमारे १५ लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पळस्पे फाटा येथून टी पॉर्इंट येथून टी पॉर्इंट काढून जेएनपीटीलाही पाणी दिले जाते. आजूबाजूची गावेही यावर अवलंबून आहेत. परंतु ही वाहिनी अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली आहे. परिणामी पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहेच, शिवाय सुमारे तीस किमी अंतर असलेल्या या जलवाहिनीलगत अनेक अनधिकृत झोपड्या तयार झाल्या आहेत. ते झोपडपट्टीवासीय पाण्यासाठी अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आसुडगाव, भिंगारी, पोदी, नवीन पनवेल, करंजाडे, वडघर बंबईचा पाडा या ठिकाणी जलवाहिनी तोडली जात आहे. त्या ठिकाणी वारंवार मलमपट्टी केली तरी दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फोडली जात आहे. त्यापैकी आसुडगाव, करंजाडे येथील प्रश्न अधिक जटील बनला असून या ठिकाणी सतत जलवाहिनी फुटताना दिसते. या व्यतिरिक्त इतर ठिकाणची परिस्थिती फारशी वेगळी नसून दररोज लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे. या व्यतिरिक्त पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होत असून ती रोखण्यास एमजेपी अपयशी ठरत आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सातत्याने शटडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे पनवेलकर आणि सिडको वसाहतवाल्यांना तीन चार दिवस पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. अनेकदा वेळेत काम होत नसल्याने पाणी पुरवठाही अखंडित होत नाही. परिणामी त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे.जुनाट झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत नसून केवळ पॅच मारण्याचे काम प्राधिकरणाकडून होत आहे. परिणामी प्रश्न निकाली निघत नाही. पाणी गळती आणि चोरीचे प्रकार थांबत नसून त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. (वार्ताहर)