‘दिवे’करांना जादा पाणी?

By admin | Published: February 19, 2015 11:05 PM2015-02-19T23:05:54+5:302015-02-19T23:05:54+5:30

दिवा गावाला पाच एमएलडी अतिरिक्त पाणी पुरविण्याचा निर्णय होऊनही सध्या केवळ अडीच एमएलडी पाण्याचाच पुरवठा होत आहे.

'Water for the lights'? | ‘दिवे’करांना जादा पाणी?

‘दिवे’करांना जादा पाणी?

Next

डोंबिवली : दिवा गावाला पाच एमएलडी अतिरिक्त पाणी पुरविण्याचा निर्णय होऊनही सध्या केवळ अडीच एमएलडी पाण्याचाच पुरवठा होत आहे. उर्वरित, अडीच एमएलडी पाणी त्वरित पुरविण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलीच, शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून वगळलेल्या २७ गावांच्या पाणीपट्टी थकबाकीवरील व्याजमाफीचाही विचार करण्याचे आश्वासन दिले.
दिव्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून येथे पाच एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे साकडे शिंदे यांनी घातले़ त्याचबरोबर जुलै २००२ मध्ये केडीएमसीतून वगळलेल्या या गावांकडून त्यापूर्वीच्या थकबाकीचीही मागणी केली जात असून त्यावर व्याज आकारणीही होत आहे. या ग्रामपंचायती पूर्वी केडीएमसीकडे बिले भरत होत्या. त्यामुळे २००२ पूर्वीची थकबाकी व व्याज माफ करावे आणि २००२ नंतरची थकबाकी ६० समान हप्त्यांत वसूल करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. देसाई यांनी त्यास अनुकूलता दर्शवली असून प्रत्येक ग्रामपंचायतीचा ताळेबंद सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, पुढील आठवड्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दाही शिंदे यांनी उपस्थित केला. एमआयडीसी भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या अन्य समस्याही त्यांनी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने हस्तांतरण फी कमी करणे, माफक दरात वाढीव चटई क्षेत्र, आरक्षित भूखंडांचा तातडीने विकास, गोळा केलेल्या सेसचा वापर सुविधांच्या विकासासाठी करणे आदी मुद्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Water for the lights'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.