Join us  

मुंबईच्या समुद्रातून नव्या वर्षात धावणार ‘वॉटर मेट्रो’; प्रशासनाकडून जोरदार हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 8:09 AM

मुंबई महानगर परिसरात जमिनीवर आणि जमिनीखाली मेट्रोचे जाळे विणले जात असताना आता पाण्यावरूनही मेट्रो धावणार आहे.

सुहास शेलार, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  मुंबई महानगर परिसरात जमिनीवर आणि जमिनीखाली मेट्रोचे जाळे विणले जात असताना आता पाण्यावरूनही मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, मुंबईकरांना नववर्षाची भेट देण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेला ‘टॅक्सी’ न म्हणता ‘वॉटर मेट्रो’ असे नाव देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुंबई ते बेलापूर मार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, यशस्वी ट्रायल रनही घेण्यात आली आहे. बेलापूर जेटीवर लहान - सहान कामे बाकी आहेत, ती त्वरित पूर्ण केली जातील. उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांशी संपर्क साधत आहोत. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सिडको प्रशासनाशी समन्वय साधून पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते मार्गावरील भार कमी करण्याचा प्रयत्न

नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी जलमार्गाने जोडण्याची योजना गेल्या तीन दशकांपासून कागदावर होती. वेळोवेळी अडथळे आल्याने ती रेंगाळली. रस्तेमार्गावरील वाहतूक कोंडीचा भार कमी करण्यासह किनारपट्टीलगतच्या शहरांना थेट मुंबईशी जोडण्याचा उद्देश यामागे आहे. 

भाडेवाढीबाबत विचार

ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात भागधारकांशी चर्चा करून मुंबई ते बेलापूर जलवाहतुकीचे दर (३०० रुपये प्रतिप्रवासी) निश्चित करण्यात आले होते. परंतु, मधल्या काळात डिझेलचे दर वाढल्याने नियोजित दरात वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सैनी यांनी सांगितले.

या मार्गांना प्रतीक्षा

- तत्कालीन नौकानयन मंत्री मनसुख मांडविया यांनी १२ मार्गांवर वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. 

- त्यात देशांतर्गत टर्मिनल ते नेरूळ, बेलापूर, वाशी, ऐरोली, रेवस, कारंजा, धरमतर, कान्होजी आंग्रे बेट आणि ठाणे. 

- तसेच बेलापूर ते ठाणे आणि गेट वे ऑफ इंडिया-वाशी ते ठाणे या मार्गाचा समावेश होता. 

- त्यापैकी मुंबई ते बेलापूर मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी अन्य मार्गांना प्रतीक्षाच आहे.

फेऱ्यांबाबत अनिश्चितता

- कॅटामरान श्रेणीतील ‘अपोलो-२’ ही स्पीड बोट या मार्गावर सेवा देईल. त्यासाठी गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेला परवाना जारी करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर किती फेऱ्या चालवाव्या, याची निश्चिती अद्याप झालेली नाही.

- पहिल्या टप्प्यात पीक अवरच्या वेळेला दोन फेऱ्या चालविल्या जातील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

टॅग्स :मुंबई