पाणी गैरवापराच्या चौकशीचे आदेश
By Admin | Published: August 3, 2015 02:50 AM2015-08-03T02:50:25+5:302015-08-03T02:50:25+5:30
शहरात रोज १८० दशलक्ष लिटर पाणी गळती व पाण्याचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार कॉँग्रेस नगरसेविका मंदानिकी म्हात्रे यांनी शासनाकडे केली होती.
नवी मुंबई : शहरात रोज १८० दशलक्ष लिटर पाणी गळती व पाण्याचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार कॉँग्रेस नगरसेविका मंदानिकी म्हात्रे यांनी शासनाकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईकरांना महापालिका मोरबे धरणातून ३६७ दशलक्ष लिटर व एमआयडीसीकडून ५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास १२ लाख असून प्रति व्यक्ती १३० ते १५० लिटर पाण्याचा वापर होतो. वाणिज्य वापरासाठी ३० दशलक्ष लिटर व इतर कारणासाठी ५ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर केला जातो. सद्यस्थितीत रोज जवळपास १८० दशलक्ष लिटर पाण्याचे गळती व दुरुपयोग होत आहे. पाण्याची उधळपट्टी थांबविण्यासाठी नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडली होती. परंतु महापौरांना सदर लक्षवेधीवर चर्चा घडवून आणली नाही. पाण्याच्या गैरवापराकडे पालिका दुर्लक्ष करीत असून करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रार म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मलनि:स्सारण केंद्रातील पाण्याचा वापर करण्याची ही मागणी केली आहे. शहरातील पाणी वापराचे आॅडिट करण्यात यावे व दुरुपयोग थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. (प्रतिनिधी)