लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील सांस्कृतिक भवनाला पालिकेने जलजोडणी दिली नसल्याने प्रशासनाने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्पुरती टँकरची मदत घेतली होती. मात्र, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद, तर वापरासाठी टँकरच्या पाण्यावर या विभागाला अवलंबून राहावे लागत असल्याने यावर महिन्याला ५० ते ६० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, युवासेना सिनेट सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे हा खर्च व त्रास लवकरच आटोक्यात येणार असून, सांस्कृतिक भवनाला पालिकेकडून जलजोडणीचे काम सुरू होणार आहे.
सांस्कृतिक भवनाला नवीन जलवाहिनी देण्याकरिता विद्यापीठ आर्किटेक्ट शरद राणे, महापालिका अधिकारी, तसेच सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल देवरुखकर शेठ आणि इतर सदस्यांची बैठक मंगळवारी पार पडली. कालिना संकुलातील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे बांधकाम पाच ते सहा वर्षांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न दिल्याने इमारतीला पाण्याची सुविधा अद्यापही मिळू शकलेली नाही. असे असतानाही प्रशासनाने या इमारतीमध्ये नाट्यशास्त्र विभाग, संगीत विभाग आणि लोककला विभाग स्थलांतरित केले. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे.
कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी विद्यापीठाकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. सांस्कृतिक भवनाला पाणीपुरवठा करण्यावर आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये खर्च झाले आहेत. एका टँकरसाठी तीन हजार रुपये खर्च होतात. असे महिन्याला २० ते २२ टँकर पाणी लागते. अचानक पाणी संपले की, विद्यार्थ्यांना हात, तोंड धुण्यासही पाणी मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे काम केल्याने अजूनही या इमारतीला महापालिकेकडून जलजोडणी मिळू शकलेली नाही, असा दावा युवासेना सिनेट सदस्यांनी करत अखेर स्वतः या कामासाठी पुढाकार घेतला.