पाणीसमस्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेली
By admin | Published: February 9, 2015 10:47 PM2015-02-09T22:47:19+5:302015-02-09T22:47:19+5:30
या प्रभागामध्ये चाकरमानी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे या प्रभागात असल्यामुळे दैनंदिन नागरी सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे
दीपक मोहिते, वसई
या प्रभागामध्ये चाकरमानी नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे या प्रभागात असल्यामुळे दैनंदिन नागरी सुविधांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा समावेश आहे. पाणी पुरेसे मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या नशीबी टँकरचा पर्याय कायमचा आहे. या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचा नियोजनशून्य कारभार या पाणीटंचाईस काही प्रमाणात जबाबदार आहे.
प्रभागामध्ये १७ ते १८ कोटींचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा स्थानिक नगरसेवक राणे यांनी केला आहे. या निधीतून केलेल्या विकासकामांमध्ये रस्ते, गटारे, नाले, गार्डन, आरोग्य केंद्राची वास्तू व समाजमंदिर इ. चा समावेश आहे. पांचाळनगर, पाटणकर पार्क, हनुमाननगर, छेडानगर, लोढा पार्क व शनी मंदिर परिसर इ. भागांचा या प्रभागात समावेश होतो. शासकीय तसेच आरक्षित जमिनीवर सरसकट अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. मध्यंतरी महानगरपालिकेने येथील अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई केली होती. ही कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा त्याच जागी अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. आजही येथे अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्याकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. साफसफाईच्या कामाकडेही अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रभागाच्या काही भागांत कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळतात.