Join us  

पाणीसमस्या गंभीर

By admin | Published: July 02, 2014 10:48 PM

मंगळवारच्या आषाढ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. असे असली तरी तब्बल एक महिना पावसाला विलंब झाल्यामुळे भात पेरण्यांतील रोपे सर्वत्र करपून गेली आहेत

जयंत धुळप, अलिबागमंगळवारच्या आषाढ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. असे असली तरी तब्बल एक महिना पावसाला विलंब झाल्यामुळे भात पेरण्यांतील रोपे सर्वत्र करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर आहे. मंगळवारपासून सुरु झालेल्या पावसाने अद्याप जोर पकडलेला नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. नदी-नाल्यानाही पाणी नसल्याने ते कोरडे पडले आहेत. गावतळ्यांनीही तळ गाठल्याने गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याची समस्या आणखी गंभीर होऊ नये, या करिता हेटवणे धरणातील पाणी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे.- पुनर्पेरण्या अपरिहार्यगतवर्षी २ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण २० हजार १०४ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा २ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २७४३ मिमी पावसाची नोंद झाली असून ही पर्जन्यघट तब्बल १७ हजार ३६१ मिमी झाली आहे. सर्वसाधारणपणे आषाढ प्रतिपदेपर्यंत जिल्ह्यात पेरलेल्या भात बियाणांची रोपे तयार होवून भात पेरण्या जवळपास ७० टक्के पूर्ण झालेल्या असतात, यंदा पेरण्यांची उगवण देखील होवू शकलेली नाही. जेथे उगवण होवून रोपे तयार झाली तेथील भात रोपे पावसाअभावी करपून गेल्याने यंदा आता भात बियाणांची पेरणी पुन्हा करण्याची वेळ आली आहे. खाडी व समुद्रकिनाऱ्याच्या भागातील भातशेती क्षेत्रातील ९ ते १० हजार हेक्टरातील पेरण्या फुकट गेल्या आहेत.