मुंबईच्या नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प; महापालिका आयुक्तांची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:43 AM2019-07-21T01:43:00+5:302019-07-21T01:43:11+5:30
नदीपात्राजवळ काँक्रिटीकरण नाही
मुंबई : नदीचे दूषित पाणी थेट समुद्रात येऊन मिसळते. समुद्रात दूषित पाणी जाऊ नये, यासाठी नद्यांवर जल शुद्धीकरणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसविण्याची परवानगी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी रिव्हर मार्चला दिली आहे.
भविष्यात नद्यांचे काँक्रिटीकरण होणार नाही, असे आश्वासनही परदेशी यांनी रिव्हर मार्चच्या सदस्यांना दिले. पश्चिम उपनगरातील दहिसर, पोयसर, ओशिवरा या तिन्ही नद्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी शुक्रवारी रिव्हर मार्चच्या सदस्यांनी प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबईतील या तिन्ही नद्या जैविकदृष्ट्या मृत होत चालल्या आहेत. त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. ‘रोड मार्च’ या मोहिमेंतर्गत वाहतूककोंडी कशी सुटेल, यावर चर्चा करण्यात आली. काँक्रिटीकरणामुळे नद्यांचे उगमस्थान मरण पावते. त्यामुळे नदीमध्ये बारा महिने पाणी शिल्लक राहत नाही. नद्यांचे काँक्रिटीकरण केले जाऊ नये, यासाठी महापालिका आयुक्तांनी ते रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मिठी नदीवरचे काँक्रिटीकरण बंद करण्यात आले असून इतर नद्यांवरचेही त्वरित बंद केले जाणार आहे. ज्या नद्यांवर संरक्षक भिंतीची गरज असेल, तिथे काळ्या दगडाची भिंत बांधून त्यावर जाळीचे आवरण लावून घेण्याचेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. दहिसर नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधून पाणी अडविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी साठविण्यास आणि भूजलाची पातळी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे नदीच्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल, तिथे कोल्हापुरी बंधारे बांधण्याची परवानगी महापालिका आयुक्तांनी दिली.
वाहतूककोंडीवर रोड मार्च मोहिमेंतर्गत दहिसर, मुलुंड, वाशी या तीन ठिकाणी ‘ट्रान्सपोर्ट हब’ची मागणी रोड मार्चच्या सदस्यांनी केली आहे. रिव्हर मार्चसोबत आदित्य कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी ट्रान्सपोर्ट हबचा प्रकल्प अहवाल बनविण्यास तयार आहेत. दरम्यान, मुंबई झोपडपट्टीमुक्त कशी करता येईल, यावर रिव्हर मार्चने केलेला अभ्यास महापालिका आयुक्तांना पटवून दिला. या अभ्यासातून मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, अशी आशा रिव्हर मार्चने व्यक्त केली.
ट्रान्सपोर्ट हब म्हणजे काय?
मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या ज्या बसगाड्या आहेत या गाड्यांचे थांबे हे दहिसर, मुलुंड व वाशीपर्यंत मर्यादित ठेवावे. मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर जायचे असेल, तर या तीन ठिकाणांहून जावे लागेल. मुंबईकरांना येथे जाण्यासाठी बस आणि मेट्रोचा वापर केला जावा. तिन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हब बनविण्याचा विचार केला जात आहे. हबमध्ये प्रवाशांसह वाहनचालकांना सर्व सुविधा दिल्या जातील. यामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होईल.