लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हा खर्च कमी करण्यासाठी १२.५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २६ हजार चौरस मीटर जागेवर २.५ मेगावॅट क्षमतेचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ३२ ते ३५ लक्ष युनिट एवढी वीजनिर्मिती होईल. यामुळे महापालिकेच्या वार्षिक वीज खर्चात सुमारे तीन कोटी रुपयांची बचत होणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षमतेने सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.भांडुप परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात दररोज दोन हजार ३०० दशलक्ष लीटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. यासाठी दर महिन्याला साधारणपणे ४५ लाख युनिट, तर वर्षाला साधारणपणे पाच कोटी ४० लाख युनिट एवढ्या विजेचा वापर होत आहे. या वीज वापरापोटी दर महिन्याला तीन कोटी ५० लाख, तर वर्षाला ४२ कोटी एवढा खर्च येत आहे. हा वीज खर्च कमी करण्यासाठी स्थापन ‘आयआयटी-मुंबई’ने २०१५ मध्ये केलेल्या अभ्यासातून या परिसरात १२.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून विद्युत खर्चात ३३ टक्के बचत साध्य होऊ शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानुसार भांडुप पश्चिम परिसरात असणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे २६ हजार चौरस मीटर जागेवर पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी सात हजार ८१३ सौरऊर्जा पॅनल लावले जाणार आहेत. या पॅनलचे अंदाजित आयुर्मान अंदाजे २५ वर्षे आहे. या २.५ मेगावॅट क्षमतेच्या पथदर्शी प्रकल्पातून दरवर्षी ३२ ते ३५ लक्ष युनिट एवढी वीजनिर्मिती होईल. जानेवारी २०१८ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात १४ कोटींची बचत दुसऱ्या टप्प्यात भांडुप संकुल परिसरात १० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३१ हजार २५२ सौरऊर्जा पॅनल्सद्वारे दरवर्षी एक कोटी ४० लाख युनिट विजेची निर्मिती होईल, असा अंदाज आहे. याचाच अर्थ भविष्यात १२.५ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे एक कोटी ७५ लाख युनिट एवढी वीजनिर्मिती होऊ शकेल. संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भांडुप संकुलाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी ३३ टक्के गरज ही या सौरऊर्जेतून भागविली जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज खर्चात दरवर्षी सुमारे १४ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.अशी ही बचत : जलअभियंता खात्याच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या या सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही विद्युत वितरण कंपनीच्या ग्रीडला जोडली जाणार आहे. परिणामी जेवढी वीज निर्माण होईल, तेवढे युनिट्स महापालिकेच्या देयकातून वजा करण्यात येणार आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात आठ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सौरऊर्जेच्या मदतीने होणार भांडुपमध्ये जलशुद्धीकरण
By admin | Published: May 06, 2017 6:45 AM