पाणीप्रश्न आज पेटणार !

By admin | Published: September 15, 2015 02:55 AM2015-09-15T02:55:08+5:302015-09-15T02:55:08+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांची पातळी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने लागू झालेली २० टक्के पाणीकपात ३० टक्क्यांवर जाण्याची टांगती तलवार सध्या

The water questionnaire today! | पाणीप्रश्न आज पेटणार !

पाणीप्रश्न आज पेटणार !

Next

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांची पातळी अद्यापही अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने लागू झालेली २० टक्के पाणीकपात ३० टक्क्यांवर जाण्याची टांगती तलवार सध्या मुंबईकरांवर आहे. मुंबई महापालिकेत भविष्यातील जलनियोजनासाठी मंगळवारी दुपारी
२ वाजता विशेष सभा होणार आहे. या सभेत पाणीकपातीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी विरोधकांनीदेखील कंबर कसली आहे. पाणीकपातीत १० टक्के वाढ होऊ देणार नाही, असा चंग विरोधकांनी बांधला आहे.
राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोर पकडला असला तरी तलाव क्षेत्रात
अद्यापही समाधानकारक पाऊस
होत नसल्याचे चित्र आहे; आणि
पुढील आठ महिन्यांसाठी मुंबईला आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी सातही तलाव क्षेत्रांत एकूण
१४ लाख दशलक्ष लीटर्स पाण्याची गरज आहे.
१४ सप्टेंबर रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा ९ लाख ९६ हजार १५९ दशलक्ष लीटर्स एवढा आहे. १ आॅक्टोबरपर्यंत हा पाणीसाठा १४ लाख दशलक्ष लीटर्स होणे गरजेचे आहे. दरम्यान, भविष्यातील जलनियोजनासाठी प्रशासनाने
२० टक्के पाणीकपात करीत जलतरण तलावासह बांधकामासाठीच्या पाण्यावर निर्बंध आणले आहेत. आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ५० टक्के पाणीकपात लागू केली आहे. शिवाय पाण्याची गळती आणि चोरी शोधण्यासह वाया जाणाऱ्या पाण्याची बचत करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. मंगळवारी होणाऱ्या पाण्याबाबतच्या विशेष सभेत प्रशासनाकडून जलनियोजनासाठी आत्तापर्यंत काय उपाययोजना आखण्यात आल्या, तलाव क्षेत्रात पाण्याचा एकूण साठा किती आहे, गळती आणि चोरीवर काय उपाययोजना केल्या, यासह भविष्यातील जलनियोजनाबाबतच्या आढाव्याचे सादरीकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी लागू झालेली
२० टक्के पाणीकपात ३० टक्क्यांवर जाऊ नये म्हणून विरोधकांनी कंबर कसली आहे. (प्रतिनिधी)

१२ लाख दशलक्ष लीटर पाण्याने दिलासा...
दुसरीकडे सध्या सुरू असलेला पाऊस तलाव क्षेत्रात दमदार बरसला आणि सात तलावांतील पाण्याची एकूण पातळी किमान १२ लाख दशलक्ष लीटर्स एवढी झाली तरी मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
परिणामी, मंगळवारी होणाऱ्या पाण्यावरील विशेष सभेत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधक प्रशासनाला नक्की काय निर्देश देतात? याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: The water questionnaire today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.