Join us

पाण्याची रिमॉडेलिंग योजना रखडली

By admin | Published: November 05, 2014 10:16 PM

ठाणे महापालिकेने मुंब्रा आणि घोडबंदर भागांत पाणी व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्य्रासाठी १२० कोटी आणि घोडबंदरसाठी ३३४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे

अजित मांडके , ठाणेठाणे महापालिकेने मुंब्रा आणि घोडबंदर भागांत पाणी व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्य्रासाठी १२० कोटी आणि घोडबंदरसाठी ३३४ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. याशिवाय, पाणी नियोजनाचे काम करतानाच घोडबंदर आणि दिव्यात एकाच वेळी या योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. यासाठी एकूण सुमारे ७०० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. यासंदर्भात दोन वेळा निविदादेखील काढण्यात आल्या होत्या. परंतु, आता या एकत्रित योजनांच्या कार्यक्रमाला केंद्राने रेड सिग्नल दिल्याने या योजना कागदावरच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेने २०१३ मध्ये घोडबंदर आणि मुंब्रा भागातील पाणी व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्याच वेळेस या भागात ड्रेनेज लाइन (मलवाहिन्या) टाकण्याचे कामही पालिकेला करायचे होते. घोडबंदर आणि दिव्यात हे काम करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. परंतु, याचा खर्च अधिक असल्याने पालिकेने खर्च वाचविण्याच्या उद्देशाने रिमॉडेलिंग आणि ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम एकत्रित करण्याचा निश्चय केला. त्यामुळे यासंदर्भातील एकत्रित अहवाल तयार करण्यात आला. या योजनेला महासभेनेसुद्धा मंजुरी दिली आहे. यासाठी लागणारा ७०० कोटींचा निधी उभारण्यासाठी हे काम जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत केले जावे म्हणून महापालिकेने याचा अहवाल केंद्राकडे पाठविला होता. विशेष म्हणजे तत्कालीन केंद्र सरकारने याला मंजुरीदेखील दिली होती.या योजनेमुळे घोडबंदर आणि मुंब्रा, दिव्याला मुबलक पाणी मिळणार आहे. ही योजना जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून केली जाणार असल्याने या कामाचा सविस्तर अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे पाठवून पत्रव्यवहार केला होता. परंतु, केवळ दोनच भागांसाठी कशासाठी तर संपूर्ण ठाणे शहरासाठी अशा प्रकारची योजना पुढे आणा आणि यासंदर्भातील अहवाल सादर करा, अशा सूचना जेएनएनयूआरएमने महापालिकेला केल्या होत्या. परंतु, आता यासंदर्भात पालिकेला विचारणा केली असता या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे स्पष्ट केले आहे.