पाणी टंचाई मिटली! आरो जल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मिळते 24 तास शुद्ध पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 05:24 PM2017-12-28T17:24:35+5:302017-12-28T17:24:48+5:30
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची भासणारी तीव्र टंचाई लक्षात घेता 2047 मध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे दंगली व जागतिक पातळीवर शुद्ध होण्याची भीती विचारवंत व्यक्त करतात.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची भासणारी तीव्र टंचाई लक्षात घेता 2047 मध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे दंगली व जागतिक पातळीवर शुद्ध होण्याची भीती विचारवंत व्यक्त करतात. मुंबई महानगरपालिका जरी मुंबईकरांना शुध्द पाणी देत असली तरी दरवर्षी पडणा ऱ्या पावसावर आणि निसर्गावर पालिकेला पाणी पुरवठ्यासाठी अवलंबून राहावे लागते.सध्याच्या १ कोटी २४ हजार लोकसंख्येलाच पाणी कमीच पडते.
मुंबई महानगरपालिका रोज 3200 एमएलडी पाणी पुरवठ्याची गरज असतांना 2700 एमएलडी पाणीपुरवठा करते.आणि भविष्यात भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांनी पुढाकार घेऊन विविध उपाययोजना आणि पाण्याची गळती रोखणे गरजेचे आहे.
मुंबई महानगर पालिकेने 24x7 पाणी पुरवठा करण्याचा पायलट प्रकल्प के पूर्व येथे राबवण्याची चर्चा अनेक वर्षे सुरू आहे. मात्र पाण्याच्या प्रत्येक ग्राहकाला मीटर असलेली पाण्याची जोडणी द्यावी लागेल. मुंबईत 60 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहतात आणि पाण्याच्या अनधिकृत जोडण्या देखिल असल्यामुळे, तिथे मीटर बसवणे अवघड आहे. तोपर्यंत 24x7 पाणी देणे सध्या तरी अशक्य आहे.
उपनगरात पाणी टंचाई लक्षात घेता उपनगरात आमदार फंडातून बोअरवेल(कुपनलिका)नागरिकांना बांधून देण्यात येत आहे.मात्र या कुपनलिकेतील पाणी हे बाथरूम आणि शोचालयासाठी अनेक ठिकाणी वापरण्यात येतो..
भविष्याची शुध्द पाण्याची गरज लक्षात घेता गोरेगाव(पूर्व)नागरीनिवारा मागील म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 19 च्या न्यू दिंडोशी गार्डन हिल सोसायटीत पाण्याची पूर्वी खूप टंचाई होती.जेमतेम 10 मिनीटे पिण्याचे पाणी येत होते.त्यामुळे येथील नागरिक हवालदिल होते.दिंडोशी विधानसभा मतदार संघातून सुनील प्रभू आमदार म्हणून निवडून आल्यावर येथील कार्यकारणी सदस्यांनी प्रभू आणि माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांना या सोसायटीत कुपनलिका देण्याची आग्रही मागणी केली.आणि आमदार प्रभू यांनी निवडणुकीपूर्वी येथील १४० नागरिकांना दिलेले वचन पूर्ण केले,आणि आमच्या सोसायटीला कुपनलिका मिळाली अशी माहिती या सोसायटीचे सचिव युवराज गायकवाड यांनी दिली.
पालिकेकडून कमी होणारा पाणी पुरवठा लक्षात घेता या कुपनलिके मधून शुद्ध पाणी सर्व १४० सभासदांना देण्यासाठी येथे आरो प्लान्ट(जलशुद्धीकरण प्रकल्प) बसवण्यासाठी युवराज गायकवाड व अध्यक्ष रणजित कदम यांनी कमिटीत आग्रह दिला.या प्रकल्पाचे फायदे येथील कमिटी व सभासदांना समजावून सांगितले.त्यांनी मान्यता दिल्यावर अखेर येथे सुमारे १२ लाख रुपये खर्च करून मजबूत आणि टिकवू स्टेनलेस स्टीलचा आरो प्रकल्प बसवण्यात आला.ताशी ५००० लिटर पाणी शुध्द करण्याचीक्षमता या प्रकल्पात असून ६० टीडीएस शुद्ध पाणी या प्लान्ट मधून बिल्सरी सारखे आणि पालिकेच्या पाण्यासारखे शुध्द पाणी मिळू लागले.गृहनिर्माण सोसायट्यांनी पुढाकार घेऊन मुंबईत राबवलेला हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
येथील १४० सभासदांच्या आरो प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्याची जोडणी प्रत्येक घरांमध्ये देण्यात आली.आणि आता आमच्या सर्व सुमारे 700 नागरिकांना या आरो प्लान्ट मधून मुबलक 24x7 ब्लिस्लरी सारखे शुध्द पाणी मिळते अशी माहिती युवराज गायकवाड यांनी दिली.सदर प्रकल्प कसा चालवायचा याचे प्रशिक्षण येथील रखवालदारांन देण्यात आले असून हा आरो जल शुद्धीकरण प्रकल्प येथील १४० सभासदांना आधारवड ठरत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
या आरो प्लान्टला आमदार सुनील प्रभू आणि स्थापत्य समिती अध्यक्ष(उपनगरे) व प्रभाग क्रमांक 41चे स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी नुकतीच भेट दिली.आणि गायकवाड आणि कदम आणि येथील पदाधिकारी यांच्यावर पाठीवर कौतुकाची थाप मारली.हा प्रकल्प येथील म्हाडाच्या सर्व २८ इमारती आणि ७८ बंगल्यासाठी राबवण्यात येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत,ज्या सोसायट्या आणि बंगल्यात कूपनलिका नसेल त्यांना आपण आपल्या आमदार फंडातून कुपनलिका देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रभू यांनी दिले.