मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:58 AM2023-03-28T09:58:16+5:302023-03-28T09:58:29+5:30

डोंगरश्री येथे मोठ्या संख्येने रहिवासी राहतात. लोकसंख्याही जास्त आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथे पाणी नाही.

Water scarcity in Malabar Hill; Water supply interrupted for eight days, tankers 3 to 5 thousand | मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार

मलबार हिलमध्ये पाणीबाणी; पाणी पुरवठा आठ दिवसांपासून खंडित, टँकर ३ ते ५ हजार

googlenewsNext

- श्रीकांत जाधव 

मुंबई : महापालिकेची जलवाहिनी नादुरूस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून मलबार हिल तीनबत्त्ती डोंगरश्री परिसरातील जवळपास १५ इमारती आणि चाळीतील रहिवाशांना पाण्यासाठी भरउन्हात वणवण करावी लागत आहे, तर पालिकेकडून मर्यादित पाणी टँकर दिले जात असल्याने येथील इमारतींना ३ ते ५ हजार रूपये जास्तीचे खर्च करून खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 
मलबार हिल तीनबत्ती वाहतूक पोलिस चौकीसमोर रमाकांत हॉटेल परिसरात ८ ते १६ मजल्यांच्या इमारती आहेत. तसेच येथे बैठी दुकाने आणि काही चाळीही आहेत. राजभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या मुख्य मार्गाजवळच हा डोंगरश्री परिसर आहे. येथेच गेल्या आठ दिवसांपासून पाणी नाही.  

आठ दिवसांपूर्वी येथील मुख्य मार्गावर रमाकांत हॉटेलसमोर महानगर गॅस पाइप लाइनचे खोदकाम सुरू होते. हे काम सुरू असताना कामगारांकडून जलवाहिनी तोडली गेली. त्यामुळे येथील परिसरात पाणीपुरवठा खंडित झाला. त्यानंतर मुख्य रस्त्यावर काम केल्यानंतर नवीन जलवाहिनी टाकून तात्पुरता पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, त्याला दाब नसल्याने सर्वत्र पाणी कमी दाबाने सोडले जात आहे. पालिकेने येथील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. दोन ते तीन ठिकाणी खोदकाम करूनही जलवाहिनीतील बिघाड मिळत नसल्याने येथील सर्व व्हॉल्व साफ करून घेण्याचे काम सुरू असल्याचे तीनबत्ती पालिका चौकीचे मुकादम महेश खुमान यांनी सांगितले. 

डोंगरश्री येथे मोठ्या संख्येने रहिवासी राहतात. लोकसंख्याही जास्त आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथे पाणी नाही. आम्ही सगळीकडे पाठपुरावा केला. भर उन्हात रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पालिकेने टँकर पाठवले आहेत. ते पाणी तोंडातही घेण्यासारखे नाही. ज्यांना शक्य आहे ते लोक खासगी टँकर मागवतात. मात्र, सर्वांना ते शक्य नाही. तेव्हा पालिकेने तातडीने जलवाहिनीचे काम पूर्ण करावे, असे येथील रहिवासी संजय करंडे यांचे म्हणणे आहे. हा रस्ता राजभवन आणि वर्षा निवासस्थानी जाणारा व्हीआयपी रस्ता असल्याने येथे दिवसा खोदकाम करण्याची परवानगी मिळत नसल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. 

टँकरसाठी ३ ते ५ हजार ! 
पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. त्यामुळे येथील १० ते १५ इमारतींना जास्तीचे ३ ते ५ हजार रूपये एका टँकरला द्यावे लागत आहे. 

रस्त्याचे खोदकाम करताना पालिकेची जलवाहिनी कापली गेली होती; पण आम्ही तातडीने ती दुरुस्त केली आहे. शिवाय रहिवाशांना पालिकेकडून टँकरने पाणी दिले जात आहे. काही इमारतीमधील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. पुढे ही काही अडचणी येऊ नये म्हणून पालिका कर्मचारी तपासणी करीत आहेत. - प्रशांत बागवे, सहायक अभियंता, पालिका ड प्रभाग 

हा रस्ता राजभवन आणि वर्षा निवासस्थानी जाणारा व्हीआयपी रस्ता असल्याने येथे दिवसा खोदकाम  करण्याची परवानगी नसली तरी रात्री काम करण्यास अनुमती दिली आहे.  तसे रात्रीचे कामही झाले आहे. आमच्याकडून कोणतेही काम अडविले गेलेले नाही, असे मलबार हिल वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Web Title: Water scarcity in Malabar Hill; Water supply interrupted for eight days, tankers 3 to 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.