Join us

पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:32 PM

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महिन्याभरापूर्वी नूतनीकरण केलेल्या पालिकेच्या चर्नी रोड येथील स. का. पाटील अभ्यासिकेमध्ये मागील १० दिवसांपासून पाणी समस्येमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. पिण्यासाठी व शौचालयासाठी पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत.

या अभ्यासिकेचे नुकतेच नूतनीकरण झाले असल्याने ही समस्या गंभीर आहे. गिरगावचे स. का. पाटील हे निसर्गरम्य उद्यान गेल्या ६० वर्षांपासून स्थानिकांच्या घरात मन करून राहिलेले आहे. येथील अभ्यासिकेत गिरगाव, चर्चगेट, पनवेल, ठाणे, भायखळा, दादर, वाशी अशा अनेक ठिकाणांहून रोज किमान १०० ते १५० विद्यार्थी येत असतात. सध्या शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याने येथे गर्दी दिसून येते. मात्र, ऐन परीक्षा काळात येथे होत असलेल्या पाणीटंचाईमुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.

पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी

पाणीपुरवठ्यात काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर महापालिकेने याची दखल घेऊन त्वरित पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी येथील स. का. पाटील अध्ययन वाटिका समितीकडून करण्यात आली आहे. 

आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथील पाणी समस्येसाठी पालिकेतील अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येत असताना त्यांना मूलभूत सुविधांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  या अभ्यासिकेचे नुकतेच नूतनीकरण झाले असल्याने ही समस्या आणखी गंभीर आहे. - वेद तटकरे, विद्यार्थी

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका