पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड : सुयोग्य नियोजन करून प्रश्न सोडविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष, तर दुसरीकडे अतिरिक्त पाणी वापराने अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. सिंचनाखाली असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाण्याचा वापर झाला. परिणामी जमिनीवर मोठ्या प्रमाणात क्षारांचा थर निर्माण झाला. दुसरीकडे पाण्याअभावी राज्यातील काही गावांना टँकरने पाणी पोहोचवावे लागते. ही विसंगती काही प्रमाणात निसर्गत: असली तरी पाण्याचे सुयोग्य नियोजन करून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने’ या विषयावर भाष्य करताना उदय गायकवाड यांनी सांगितले की, अतिरिक्त पाणी, रासायनिक खतांचा वापर यामुळे मातीचे प्रदूषण झाले. त्यातून माणूस आणि जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पर्यावरणपूरक शेती करण्याची, शेतीत सेंद्रिय खतांचा, ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर होण्याची गरज आहे. राज्यातील जवळपास ३० मोठ्या आणि ३०० छोट्या शहरांमध्ये रासायनिक उद्योगांतून बाहेर पडणारे पाणी, नागरी मैला, सांडपाणी हे नदी व तलावात सोडल्याने जलस्त्रोतांचे पाणी प्रदूषित होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. राज्यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पर्यावरण स्नेही शाश्वत विकासाचे सूत्र अवलंबून प्रयत्न करण्याची गरज आहे.
देवांसाठी संरक्षित केलेल्या व वृक्षसंवर्धनाची परंपरा असणाऱ्या देवरायांनी राज्यातील पर्यावरणाला समृद्ध केले आहे. पश्चिम घाट व राज्याच्या अन्य भागात लोकांनी देवराया राखल्या व या माध्यमातून त्या-त्या भागातील मूळ वनस्पती, बियाण्यांचे वाण जपून ठेवले आहेत. भविष्याच्या जैवविविधतेचा विचार करता मूळ बियाणे व वाणांचे केंद्र असणाऱ्या अशा देवराया हा पर्यावरणाचा समृद्ध ठेवा आहे, याकडेही गायकवाड यांनी लक्ष वेधले.