टाकीपठार परिसराला पाणीटंचाईच्या झळा

By admin | Published: January 3, 2015 11:43 PM2015-01-03T23:43:30+5:302015-01-03T23:43:30+5:30

भागाचा कायापालट करणारे असून याचा नक्की फायदा दुष्काळी पठार भाग असलेल्या आणि सदैव पाणीटंचाईत होरपळणा-या भागाला होणार आहे.

Water scarcity in the tankyard area | टाकीपठार परिसराला पाणीटंचाईच्या झळा

टाकीपठार परिसराला पाणीटंचाईच्या झळा

Next

भरत उबाळे ल्ल शहापूर
तालुक्यातील इतर १० धरणांपैकी नामपाडा (केतरकुंड) हे एकमेव धरण शहापूरच्या दुर्गम अत्यंत ग्रामीण अशा टाकीपठार भागाचा कायापालट करणारे असून याचा नक्की फायदा दुष्काळी पठार भाग असलेल्या आणि सदैव पाणीटंचाईत होरपळणा-या भागाला होणार आहे. परंतु मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेली धरणे जबाबदारीने पूर्ण होत असताना हे एकमेव धरण असे आहे की ज्याचा शहापूरच्या एका भागाला उपयोग होणार असल्याने जाणीवपूर्वक रखडवले जात आहे. या मागचा ठेकेदाराचा दृष्टीकोन तपासण्याची यंत्रणेचीही मानसिकता नसल्याने नडगाव, सोगाव, शिरवंजे, नांदगाव, टाकीपठार या गावांना पाणीटंचाईच्या झळांना याही वर्षी सामोरे जावे लागत आहे. जांभे धरण ४.८३९ द.ल.घनमीटर क्षमतेचे असून तालुक्यातील छोट्या धरणांपैकी सर्वात जास्त क्षमतेचे ते धरण आहे. दुबार पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना या धरणांचा विशेष फायदा होतो. लघुपाटबंधारे विभागाचे शहापूर कार्यालय २००२ नंतर अचानक मुरबाड येथे हलविल्याने शेतकऱ्यांना लहान सहान बाबींसाठी मुरबाड येथे जावे लागते. शहापूरमधून शेतकऱ्यांमार्फत पाणी कर मिळत असूनही हे कार्यालय मुरबाडमध्ये हलविल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या शहापूर येथे शाखा कार्यालय असून त्याची इमारत मोडकळीस आली आहे. तेथे अवघे दोन कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या हातात अर्ज स्वीकारण्याचे देखील अधिकार नसल्याने खुर्चीत बसण्यापलिकडे त्यांना कामच नसते. शहापूरमधील ११ मोठ्या आणि ७ लघु धरणांमुळे मात्र शहापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. शहापूरच्या पाण्यावर मुंबई, ठाणे मात्र पोसले जात आहे. सध्या शहापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण स्वरुप धारण करीत आहे. गावे, वाड्या, वस्त्यां, या नाल्यांच्या प्रभाव क्षेत्रात शिरून खड्डे खोदून पिण्याचे पाणी मिळवित आहेत. हे पाणी माती, चिखलमिश्रीत झाले असल्याने कावीळ, गॅस्ट्रोसारखे आजारांचे बळी आदिवासी बांधवांना ठरावे लागत आहे. तानसा अभायरण्यातल्या धरणाखालील वाड्यांना वर धरण आणि खाली खड्डे खोदून त्यातील दूषित पाणी प्यावे लागत आहे. वाड्या वस्त्यांसाठी पाणीपुरवठा करण्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे नियोजन गेल्या काही वर्षात येथे कोलमडून पडले आहे. सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा योजनांवर फक्त खर्च दाखविला जात असून प्रत्यक्षात या योजना अस्तित्वातच नसल्याचे आश्चर्य पहायला मिळत आहे. गेल्या २० वर्षात एकट्या ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठाच्या महाजल कार्यक्रम, वर्धित वेग कार्यक्रम, आदिवासी, बिगरआदीवासी क्षेत्राच्या योजनांसाठी सुमारे ५० कोटीचा निधी पाण्यात गेला आहे. हा आकडा निव्वळ वार्षिक टंचाई आराखड्याचा आहे. प्रत्यक्ष योजनांच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेला निधी कोट्यवधीच्या घरात आहे.

तालुक्यात लघु पाटबंधारेची सात धरणे आहेत. जांभे, धरणामुळे, नेहरोली, जांभे, लेनाड, शिरगाव, आदिवली धरणामुळे आष्टे, आदिवली, मानेखिंड, चरीव, मूसई धरणामुळे मूसई, खैरे, खराडे धरणामुळे निमनपाडा, बोंद्रेपाडा, खराडे, चांग्याचापाडा, डोळखांब धरणामुळे हेदिवली, साकुर्ली, बांधणपाडा, वेहळोली धरणामुळे वेहळोली, चिखलगांव, मोहपाडा, पाटोळ धरणामुळे पाटोळवाडी, वाशाळा या गावांना सिंचनाचा लाभ झाला आहे. ही सर्व धरणे मातीबांधाची असून जांभे धरण मात्र, दगडी सिमेंटबांधाचे आहे. यातील बरीच धरणे एप्रिल अखेरपर्यंत आटत असल्याने त्यांच्या पाण्याचा फायदा मार्च या शेवटच्या महिन्यापर्यंतच असतो.

 

Web Title: Water scarcity in the tankyard area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.