लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात भिंतींच्या बाजूला असलेल्या एक्सपान्शन जॉईंटमध्ये सोमवारी पाणी झिरपताना दिसून आले. त्यामुळे करोडो रुपये खर्चूनही हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला. बोगद्यात ४ जॉइंट्सपैकी एका जॉइंट्समध्ये ही गळती झाल्यामुळे वाहतुकीला दिवसभरात किंवा यापुढे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अडथळा नाही, असे कोस्टल रोड प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
११ मार्च रोजी कोस्टल रोडची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली असून जवळपास ७ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. लवकरच याची दक्षिण मार्गिका खुली करण्याचा विचार प्रकल्प अधिकाऱ्यांचा आहे. मात्र, त्याआधीच कोस्टल रोडच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पडताना दिसत असल्याने हा रस्ता खर्च वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता मुंबईकरांकडून उपस्थित होत आहे.
इपॉक्सी ग्राउंटिंग इंजेक्शनचा वापर
येत्या २ ते ३ दिवसांत बोगद्यातील भिंतींची डागडुजी करण्यात येईल. बोगद्यात भिंतींच्या बाजूला गळणारे पाणी हे भिंतीला गेलेले तडे नाहीत. त्यामुळे पुढच्या २ ते ३ दिवसांत त्याचे निरीक्षण करून त्यावर इपॉक्सी ग्राउंटिंग इंजेक्शनचा वापर केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘श्रेय लाटण्याचा परिणाम’
घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी शिंदे सरकारकडून कोस्टल रोड प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि आता त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागणार असल्याची टीका सचिन अहिर यांनी केली आहे. कोस्टल रोडची वजन किती वाहून नेणार याची चाचणी करण्यात आली. मात्र, पावसाळ्यापूर्वी चाचणी केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे अनुपालन प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. फक्त निवडणूक समोर ठेवून उद्घाटन करण्यात आलेला हा प्रकल्प आता किती सुरक्षित असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.